सोशल मीडियावर सध्या एक फोटो जोरदार व्हायरल होत असून त्याची खूप चर्चा रंगली आहे. हा फोटो एका Zomato डिलिव्हरी एजंटचा आहे, जो एक दिव्यांग आहे. कठीण काम करण्याची त्याची प्रबळ इच्छाशक्ती या फोटोतून दिसून आली आहे. या एजंटला ऑर्डर डिलिव्हरीसाठी NeoMotion इलेक्ट्रिक वाहन देण्यात आलं आहे. हा फोटो ट्विटर युजर नारायण कन्ननने पोस्ट केला आहे. या फोटोसह, त्याने झोमॅटो आणि त्याचे सीईओ दीपिंदर गोयल यांचं कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये नारायण याने लिहिलं की, "अशा प्रकारची आणखी उदाहरणं समोर आली पाहिजेत. तुमची कंपनी खरोखरच चांगलं काम करत आहे. जरी काही चुकीच्या ड्रायव्हर्समुळे रस्त्यावर समस्या निर्माण झाल्या आहेत, पण हा क्षण खास आहे. त्याहून अधिक हृदयस्पर्शी आहे. ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. शाब्बास!"
आणखी एका युजरने लिहिलं आहे की "हा फोटो पाहून खूप छान वाटलं. ही विचारसरणी अतिशय अद्भुत, शक्तिशाली आणि सकारात्मक आहे. मला तुमच्या कामाचा अभिमान आहे." झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनीही हा फोटो शेअर केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच गोयल यांनी आनंदाची बातमी दिली होती की Zomato ने NeoMotion नावाच्या मे़डिकल कंपनीसोबत भागीदारी केली आहे, जी विशेष गरजा असलेल्या लोकांसाठी वस्तू बनवते.
चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमाचे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, "मला अभिमान आहे की, झोमॅटोकडे आता विशेष गरजा असलेले 160 पेक्षा जास्त डिलिव्हरी पार्टनर आहेत, ज्यांनी आतापर्यंत 39,000 ऑर्डर डिलिव्हर केल्या आहेत. आमचं लक्ष्य आहे की डिसेंबर 2023 पर्यंत 300 पार्टनर जोडले जावेत."