सोशल मीडियावर अनेक गोष्टी या व्हायरल होत असतात. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने आपली व्यथा मांडली आहे. सोहम भट्टाचार्य याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे, सोहमला एक त्रस्त झालेला झोमॅटो डिलिव्हरी बॉय भेटला. त्याने सांगितलं की, बहिणीच्या लग्नाच्या आधीच कंपनीने त्याचं झोमॅटो अकाऊंट बंद केलं आहे.
झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा फोटो शेअर करताना सोहम भट्टाचार्यने लिहिलं की, हा GTB नगरजवळ खूप रडत होता. तो सर्वांकडून पैसे मागत होता. त्याने सांगितले की त्याने काहीही खाल्लेल नाही, तो आपल्या बहिणीच्या लग्नासाठी सर्व पैसे साठवत आहे. झोमॅटो अकाऊंट बंद झाल्यानंतर तो रॅपिडोसाठी काम करत आहे. सोहमने लोकांना डिलिव्हरी बॉयला मदत करण्याची विनंती केली आहे.
सोहम भट्टाचार्य नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये त्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा फोटो शेअर केला आणि सांगितलं की कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या बहिणीच्या लग्नाच्या आधी त्याचं अकाऊंट बंद केलं. ही पोस्ट काही वेळात जोरदार व्हायरल झाली आणि 24 तासांपेक्षा कमी वेळात तब्बल 29 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे.
झोमॅटो कंपनीनेही यावर उत्तर दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "आम्ही आमच्या डिलिव्हरी पार्टनर्सना खूप महत्त्व देतो आणि अकाऊंट बंद करण्यासारख्या कृतींचा त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो हे आम्हाला समजतं. तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही अशा बाबी गांभीर्याने घेतो. आम्ही तुम्हाला विश्वास देतो की आम्ही याची चौकशी करू. आमचे डिलिव्हरी पार्टनर्स आमच्या ग्राहकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत."