झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) सारख्या कंपन्यांचे काही डिलिव्हरी पार्टनर सायकलवरून लोकांच्या घरी जेवण पोहोचवतात हे तुम्हीही पाहिले असेल. सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अशातच सायकलने पोहोचवणे सोपे काम नाही. अशाच एका फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचा फोटो एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्याची कथा शेअर केली. यानंतर पाहताच लोकांनी क्राऊड फंडिग सुरू केलं आणि आणि त्याला सायकलऐवजी मोटारसायकल भेट मिळाली.
ट्विटर युझर आदित्य शर्मानं सोमवारी झोमॅटोचे डिलिव्हरी पार्टनर दुर्गा मीणा यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला. ४२ डिग्रीच्या तापमानातही त्यांनी कशाप्रकारे सायकलवरून वेळेत फूड डिलिव्हरी केली असं लिहिलं. दुर्गा मीणा हे गेल्या १२ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. परंतु कोरोना दरम्यान त्यांची नोकरी गेली. यानंतर त्यांनी झोमॅटोसोबत फूड डिलिव्हरी करणं सुरू केलं. गेल्या चार महिन्यांपासून ते कार्यरत असून महिन्याला त्यांना १० हजार रुपये मिळतात, असंही त्यानं म्हटलं होतं.
बीकॉमही केलंयट्विटर युझरने मीणा यांच्याशी केलेल्या चर्चेचा संदर्भ देत त्यांनी बी कॉमचं शिक्षण घेतल्याचं म्हटलं. तसंच त्यांना एमकॉम करायचं आहे. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना झोमॅटोसबोत काम करावं लागत आहे. ते इंग्रजीत संवाद साधत होते आणि त्यांना इंटरनेटबाबतही सर्वकाही माहित आहे. सर्वकाही ऑनलाइन होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा असल्याचं सांगत त्यांनी आपल्याला लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शनही घ्यायचं आहे, असं म्हटल्याचं ट्विटर युझरनं सांगितलं.
या कमाईच्या माध्यमातून काही जणांकडून घेतलेलं कर्ज आपण फेडत आहोत. त्यामुळे बचतही कमी होत आहे. तसंच सायकलच्या माध्यमातून केवळ १०-१२ डिलिव्हरीच करता येत असल्याचं सांगत दुर्गा यांनी बाईक खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं आदित्यनं सांगितलं. त्यांनी त्याला बाईक खरेदी करण्यासाठी डाऊनपेमेंट करण्याची विनंती केली. तसंच ईएमआय आपण भरू असलं म्हटलं. याशिवाय डाऊनपेमेंटची रक्कम ४ महिन्यात व्याजासकट परत करू असं म्हटलं.
यानंतर आदित्यनं ट्विटरवर ७५ हजार रुपये जमवण्याची मोहीम सुरू केली. लोकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला. तसंच सायकल ऐवजी मोटरसायकल घेण्याची त्यांची इच्छाही पूर्ण झाली. दरम्यान, यानंतर त्यांनी सर्वाचे आभारही मानले.