Zomato, Anniversary Funny Banter: सध्या भारतात काम सुलभ करण्यासाठी कंपन्या आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरत आहेत. परंतु हे तंत्रज्ञान वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण ते भावनांना फारसे प्राधान्य देत असते आणि केवळ दिलेल्या सूचनांचे पालन करते. झोमॅटोच्या बाबतीतही असेच काहीसे घडल्याचे दिसले. बेंगळुरूस्थित झोमॅटोचे ग्राहक शोभित बाकलीवाल यांनी ॲपमधील त्रुटीबद्दल सांगितले तेव्हा चर्चा सुरू झाली.
झोमॅटो ॲपमध्ये जन्मतारीख आणि लग्नाचा वाढदिवसाची तारीख टाकणे बंधनकारक होते, असे शोभितला आढळले. पण नंतर ते एडिट करता येणार नाही असेही दिसले. यावरून त्याने झोमॅटोला प्रश्न विचारला. सोशल मीडियावर एक विचित्र प्रश्न विचारत शोभितने झोमॅटोच्या ॲनिव्हर्सरी पॉलिसीबद्दल गमतीने विचारले, "जर एखाद्याने पुन्हा लग्न केले तर काय?"
झोमॅटोच्या ग्राहक सेवा खात्याने शोभितच्या प्रश्नाचे उत्तर दिले, जे खूप विचित्र होते. हा प्रश्न सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला. झोमॅटोने उत्तर दिले की, तुम्ही अँनिव्हर्सरी एडिट करू शकणार नाही आणि आम्ही लग्नविषयक सल्लागार बनणे अपेक्षित नाही. जर एखाद्याला चांगले जेवण हवे असेल तर, आम्ही नक्कीच देऊ.
झोमॅटोला काय म्हणायचे आहे असा प्रश्न सर्वांना पडला. अनेकांना Zomato चे हे उत्तर अजिबात आवडले नाही. एका युजरने म्हटले, "एआय तुमच्या व्यवसायासाठी हेच करते. झोमॅटो याआधी चमकदार आणि मजेदार जाहिरातींसाठी ओळखली जात होती." दुसरा म्हणाला, "हे सरळ ChatGPT वरून दिसते आहे." तिसऱ्याने सल्ला दिला, "झोमॅटोसारखा सोशल ब्रँड बनवण्यासाठी इतके वर्ष गेले, त्याची अशी वाट लावू नका. यासाठी कोणत्याही मोठ्या भाषा मॉडेलची (LLM) मदत घेऊ नका."