सोलापूर : ज्या मतदारांचे वय ८५ प्लस आहे, अशा मतदारांना घरीच मतदानाचा विशेष अधिकार मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार बुथ लेव्हल ऑफिसर अर्थात बीएलओंनी घरोघरी जाऊन अशा मतदारांचा सर्व्हे केला. यात २ हजार ९३० मतदारांनी घरी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. उर्वरित १ लाख ६ हजार मतदारांनी मतदान केंद्रात जावून मतदान करण्यास सक्षम असल्याचे अधिकाऱ्यांना कळवले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ८५ पार केलेल्या वृद्ध मतदारांना 'होम व्होटिंग'चा अधिकार मिळाला आहे.अशा ८५ पुढील मतदारांच्या घरी निवडणूक कार्यालयाचे प्रतिनिधी मतपत्रिका घेऊन जातील.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात असे एक लाख ९ हजार १६२ मतदार आहेत. यापैकी २ हजार ९३० मतदारांची नोंदणी झाल्याने त्यांच्याच घरी निवडणूक कार्यालयाचे तीन कर्मचारी मतपत्रिका घेऊन जातील. घरीच मतदान करून घेतील. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे.