गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. माघी यात्रा कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. माघी यात्रा कालावधीत गर्दी होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. संचारबंदीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. विनाकारण फिरताना आढळल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यातंर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही गजानन गुरव यांनी केले आहे.
पोलिसांची त्रिस्तरीय नाकाबंदी
पंढरीत माघी यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर समितीमार्फत २२ व २३ फेब्रुवारी रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवले आहे. शहरासह परिसरातील १० गावांमध्ये २४ तासांची संचारबंदी लागू केली आहे. इतर राज्यातून व राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या दिंडी व भाविकांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने त्रिस्तरीय नाकाबंदी केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
नगरपालिकेच्या कारवाईत २० हजाराचा दंड वसूल
पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. काेरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील दुकानदार, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते अशा १७० जणांवर नगरपालिकेच्या वतीने कारवाई करून २० हजार १०० रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.
कोट ::::::::::::::::::::
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेकडून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग तसेच शहरातील आवश्यक ठिकाणचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. विनामास्क घराबाहेर पडू नये.
- अनिकेत मानोरकर
मुख्याधिकारी, पंढरपूर