शेतकऱ्यांचा शेतीमाल व फळे देशाच्या बाजारपेठेत जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ ऑगस्ट रोजी ‘किसान रेल्वे’ सुरू केली. सांगोला रेल्वेस्थानकामधून सांगोला-मुझफ्फरपूर, बंगलोर-सांगोला-आदर्शनगर (दिल्ली), सांगोला-हावडा व्हाया सोलापूर, सांगोला-शालिमार (कोलकाता) व्हाया नागपूर, सांगोला-आदर्शनगर (दिल्ली) अशा पाच किसान रेल्वे धावत आहेत. या किसान रेल्वेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.
एकट्या सांगोला स्थानकातून ९० हजार ७९ क्विंटल डाळिंब, सिमला मिरची, द्राक्षे, बोर, सीताफळ, खरबूजच्या वाहतुकीतून रेल्वेला ४ कोटी १९ लाख ९७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे; तर मोडनिंब स्थानकातून २२ क्विंटल सिमला मिरचीच्या वाहतुकीतून रेल्वेला १० हजार रुपयांचे उत्पन्न, बेलवंडी स्थानकातून १८९६ क्विंटल लिंबू व डाळिंबाच्या वाहतुकीतून रेल्वेला ८ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न, बेलापूर स्थानकातून १६५० क्विंटल माशांच्या वाहतुकीतून ६ लाख ३१ हजार रुपयांचे उत्पन्न, कोपरगाव स्थानकातून ३३९७ क्विंटल, डाळिंबाच्या वाहतुकीतून १३ लाख ५९ हजार रुपयांचे उत्पन्न, तर जेऊर स्थानकातून ७८१६ क्विंटल केळी, पेरू, आले, टोमॅटो, कारल्याच्या वाहतुकीतून ३२ लाख ७८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
शेतकऱ्यांना मिळालेली सबसिडी
सांगोला-मुझफ्फरपूर किसान रेल्वेच्या ५३ फेऱ्यांमधून शेतकऱ्यांना १ कोटी ८ लाख ७६ हजार, बंगलोर-सांगोला-आदर्शनगर किसान रेल्वेच्या १३ फेऱ्यांमधून शेतकऱ्यांना २१ लाख ९४ हजार, सांगोला-हावडा किसान रेल्वेच्या १२ फेऱ्यांमधून शेतकऱ्यांना ११ लाख ९८ हजार, सांगोला-शालिमार किसान रेल्वेच्या १० फेऱ्यांमधून शेतकऱ्यांना १० लाख १६ हजार, सांगोला-आदर्शनगर किसान रेल्वेच्या २ फेऱ्यांमधून शेतकऱ्यांना ४ लाख २४ हजार रुपयांची सबसिडी मिळाली आहे.
रेल्वेला मिळालेले उत्पन्न
सांगोला स्थानकातून धावणाऱ्या किसान रेल्वेतून ७२ टक्के डाळिंब, १३ टक्के केळी, ६ टक्के द्राक्षे, ४ टक्के सिमला मिरची, ३ टक्के लिंबू व २ टक्के इतर माल व फळांच्या वाहतुकीतून सुमारे ५ कोटी ५ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.