बार्शी : माढा तालुक्यातील तीन ठिकाणी ग्राहकांनी चोरून विजेचा वापर केल्याने वापरलेल्या बिलासह तडजोडीची रक्कम भरली नसल्याने या तिघांनी १ लाख ८७ हजार रुपयांचे महावितरणचे आर्थिक नुकसान केले आहे. याप्रकरणी बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कुर्डूवाडी महावितरणचे सहायक अभियंता जयश्री वाघमारे यांनी बाबूराव सावळे (रा. रिधोरे) व मोतीराम पांढगलेरा (रा. अंबड), तर दुसऱ्या कनिष्ठ अभियंता स्मृती ढवरे (रा. माढा) यांनी अनिल उघाडे (रा. कुर्डू) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, बार्शी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार यातील बाबूराव सावळे यांनी घरगुती मीटर डायरेक्ट करून वीज चोरी केली. हे उघडकीस येताच वीजचोरीसह दंड व तडजोड रक्कम ३० हजार ९५३ रुपये ठरविण्यात आली, तर अंबड येथील पांढगलेरा यांनी पोलवर वायर टाकून सहा महिने वीज चोरून वापरल्याचे उघड झाले. दंडाच्या रकमेसह ४,५८० रुपयांचे नुकसान केले, तर तिसरा प्रकार कुर्डू येथे उघड झाला आहे. सिंगल फेज मीटर बायपास करून वीज चोरून वापरत असल्याचे निदर्शनास आले. मीटर काढत असताना विरोध झाला. त्यांनी ७७ दिवस ४,९४८ युनिटची चोरी केली, असे एकूण १ लाख ५१,७१७ रुपयांचे महावितरणचे नुकसान केले.