अकलूज : कोरोना व्हायरसमुळे इराण देशात अडकून राहिलेले अकलूज परिसरातील १२ यात्रेकरु रविवारी पहाटे भारतात दिल्ली विमानतळावर सुखरुप परतले, मात्र तेथून त्यांना खास विमानाने राजस्थान राज्यातील जेरुसलेम येथे सकाळी ७ वाजता हलविले. तेथेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली १४ दिवस ठेवण्यात येणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते घरी परत येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितली.
फेब्रुवारी महिन्यात मुस्लीम समाजाच्या इराक, इराणमधील पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी भारतातून १ हजार ८०० यात्रेकरु गेले होते. कोरोनाच्या भीतीने इराण देशाने दळणवळणाच्या सर्व सीमा बंद केल्यामुळे सर्वच यात्रेकरु इराणमध्ये १५ दिवसांपासून अडकले होते. त्यामुळे सर्वच यात्रेकरुंचे परिवार चिंतेत होते. त्यापैकी २५० यात्रेकरु रविवारी मायदेशात दिल्ली येथे पोहोचले आहेत़ त्यांना लगेच राजस्थानातील जेरुसलेम येथे नेले़ त्या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यात अकलूज परिसरातील १२ यात्रेकरुंचा समावेश आहे. गेल्या १५ दिवसांपासून यात्रेसाठी घरातून गेलेले सदस्य कधी परत येतील, अशी आस लावून बसलेल्या त्या १२ कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कोल्हापूर येथील एका टुर्सच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज परिसरातील १२, सांगोला येथील १५, कोल्हापूर येथील १७ असे ४४ मुस्लीम भाविक २१ फेब्रुवारी रोजी यात्रेला गेले होते. इराण येथील सिमन, बुस्टन, मशरुद, मच्छद व तेहरान येथील पवित्र दर्ग्यांचे त्यांनी दर्शन घेतले़ ते बगदाद शहराला भेट देण्यासाठी इराककडे रवाना होणार होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता इराक सरकारने पवित्र स्थळांच्या यात्रेला स्थगिती दिली.
याच धरतीवर इराण देशाने आपल्या देशातील विमान वाहतूक सेवा बंद केल्याने भारतातून इराणकडे गेलेले १८०० मुस्लीम बांधव इराणच्या कुंम-तेहरान या शहरात अडकले. कोरोना व्हायरसमुळे इराण सरकारने सावधानता म्हणून विमान वाहतूक सेवा बंद केल्याने सर्व विमानसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे यात्रेकरूंना तेथील हॉटेलमध्ये ठेवले होते. त्यांना तातडीने भारतात परत आणावे यासाठी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून पत्रव्यवहार केला. इराणमधील भारतीय दुतावास कार्यालयाने यात्रेकरुंची योग्य ती काळजी घेऊन शनिवारी रात्री ९ वाजता एका खास विमानाने त्यांना भारतात पाठविण्याची सोय केली.
नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये : मोहिते-पाटील- महाराष्ट्रातील ४४ यात्रेकरूंना सुखरुप मायदेशी परत आणण्यासाठी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रयत्न केले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास गेलेल्या यात्रेकरुंच्या नातेवाईकांनी मोहिते-पाटील यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. त्यावेळी मोहिते-पाटील यांनी आपण भारत सरकारला पत्राद्वारे विनंती केली होती. प्रधानमंत्री कार्यालयाला त्याबाबतचे पत्र पाठविले होते. तसेच जी-२० देशाचे भारताचे प्रतिनिधी व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनाही सर्व यात्रेकरुंना मायदेशी लवकर परत आणावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार इराण-इराकच्या यात्रेवर असलेल्या मुस्लीम बांधवांना रविवारी पहाटे भारतात आणण्यात आले आहे. ते आता राजस्थान येथे सुखरुप पोहोचले असून तेथे ते सुरक्षित आहेत. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरु नये, असे माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले़
इराणच्या तेहरानमध्ये वडिलांसह सर्व सहकारी कोरोना व्हायरसमुळे २७ फेब्रुवारीपासून अडकले होते. त्यांच्याशी कुटुंबांचा मोबाईलवरुन सातत्याने संपर्क होत होता़ त्यामुळे भीती वाटत नव्हती. मात्र ते केव्हा परत येतील एवढीच काळजी होती. आता ते सर्व भारतात सुखरूप आल्याने मनावरील दडपण कमी झाले.- अल्लाह मेहेरबान, शाहरुख शेख, यात्रेकरुंचे नातेवाईक