बार्शी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. विविध बँकांमध्ये १२ कोटींच्या ठेवी तर १० कोटींची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती सभापती रणवीर राऊत यांनी दिली.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार चालवला आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सहकार्याने बाजार समितीच्या विकासाची घोडदौड सुरु आहे. मार्केट यार्डमधील रस्ते, गटारे, वृक्षारोपण, विद्युत सुविधा आदींवर भर देऊन बाजार समितीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ केलेली आहे. सन २०२०मध्ये बाजार समितीत मार्केट फीमधून ८ कोटी ८६ लाख ९७ हजार ३४७ रुपये तर इतर उत्पन्नातून १ कोटी १८ लाख २९ हजार २०६ रुपये मिळाले.
यातील ५ कोटी ४४ लाख ५१ हजार ३७० रुपये खर्च झाला. त्यातून ४ कोटी ६० लाख ७५ हजार १८२ रुपये नफा (वाढावा) झाला. बाजारपेठेमध्ये सोयीसुविधा पुरविण्यात आल्यामुळे बाजारपेठेतील मालाची आवकही वाढली आहे. शेतकऱ्यांच्या मालाचे चोख वजन, ताबडतोब पट्टी यामुळे मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन व्यापारामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे इतर बाजार समितींचे पदाधिकारी बाजार समितीला भेट देऊन बाजार समितीमधील व्यापाराची पाहणी करत आहेत. बार्शीच्या ई-नाम योजनेची महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समितींमध्ये निवड झालेली आहे. ‘ई-नाम’मुळे शेतकऱ्यांना ई-मार्केटिंगचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल तारण ठेवून कर्ज मिळण्याची व्यवस्था झालेली आहे.
बाजार आवारामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करुन पर्यावणाचा समतोल राखलेला आहे. महाराष्ट्रातील बाजार समितींमध्ये पहिला सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प लवकरच सुरु करत आहोत. त्यामुळे विजेच्या बाबतीमध्ये बाजार समिती पूर्णपणे स्वावलंबी होणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या दरमहाच्या लाखो रुपयांच्या वीजबिलाची बचत होणार आहे. बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार असल्याचे संचालक रावसाहेब मनगिरे यांनी सांगितले.
बाजार समितीने विविध बँकेत १२ कोटी २ लाख ५० हजार ७९२ एवढ्या रकमेच्या ठेवी ठेवल्या आहेत. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षामध्ये विविध विकासकामांची ३ कोटी ८५ लाख ९४ हजार ७६८ एवढ्या रकमेची बिलेही अदा केली आहेत. तर सध्या ९ कोटी ६१ लाख ४३ हजार ४१८ रुपयांची कामे बार्शी व वैराग उपबाजारात प्रगतीपथावर आहेत. तसेच व्यापारी गाळे, सौरऊर्जा प्रकल्प, शेतकरी निवासस्थान, वजनकाटा, शेड व मूलभूत कामे, आदी ८ कोटी ३६ लाख २५ हजार रुपयांची कामे मंजूर आहेत. बार्शीत हजार टन क्षमतेची दोन तर वैरागला एक शीतगृह, जनावरांसाठी निवारा शेड आदी कोट्यवधी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत, असे रणवीर राऊत यांनी सांगितले.
बाजार समितीच्या या विकासात शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार, वरणी कामगार, संचालक मंडळ व कर्मचारी यांचाही मोलाचा वाटा आहे.
-----