सोलापूर : आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पाईप खरेदीत महापालिकेचे ३८ लाख ७२ हजार वाचविले म्हणून ९ कोटी ७४ हजारांच्या पाईप खरेदीला स्थायी समितीच्या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीची सभा शुक्रवारी कौन्सिल हॉलमध्ये सभापती बाबा मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सर्वसाधारण सभेत टीकेचे लक्ष्य ठरलेले आयुक्त गुडेवार यांच्याकडून आलेले पाईप खरेदीचे प्रकरण स्थायी समितीमध्ये आज एकमताने मंजूर करण्यात आले. २0 जूनच्या सभेत हे प्रकरण तहकूब करण्यात आले होते. आयुक्त गुडेवार यांनी लॅन्को इंडस्ट्रीजच्या मक्तेदाराशी चर्चा करून टेंडर रकमेत दोन टक्के सूट देण्याची विनंती केली. मक्तेदाराने हे मान्य केल्याने महापालिकेचे पैसे वाचले म्हणून सदस्यांनी आयुक्तांचे अभिनंदन करून ठराव एकमताने मंजूर केला. त्याचबरोबर पंधे अपार्टमेंटमध्ये पाईपलाईन घालणे, भवानीपेठ वॉटर वर्क्सकडील मोटारी दुरुस्त्या, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार, उद्यान अधीक्षक स्वप्निल तारू, सहायक अधीक्षक अजयकुमार चव्हाण यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. तर रविवारपेठ व होटगी रोड अग्निशमन केंद्रातील जुनी कर्मचारी वसाहत पाडून नवीन निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव फेरसादर करण्यात आला. बावालाल वकील बहुउद्देशीय संस्थेने प्रभाग ३१ अ मधील समाज मंदिर मुदतीच्या भाडेकरारावर मागितले होते. हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला. इब्राहिम कुरेशी व चेतन नरोटे यांनी हा प्रस्ताव दिला होता. ----------------------मासेमारी प्रकरण तहकूबधर्मवीर संभाजी तलावातील मासेमारीचा ठेका अनिल जाधव यांना देण्यात आला होता. रकमा भरूनही महापालिकेने मुदतवाढ न देता दुसरे टेंडर काढले. हे कृत्य बेकायदेशीर असल्याने मक्तेदार जाधव यांनी न्यायालयात धाव घेऊन स्टे घेतला. यामुळे जाहिरात, न्यायालय कामकाजाचा भुर्दंड महापालिकेस सोसावा लागला. हा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, असा प्रस्ताव दिलीप कोल्हे, चेतन नरोटे यांनी दिला होता. याला नाना काळे, विजया वड्डेपल्ली, शिवानंद पाटील यांनी हरकत घेतली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विषय चर्चेला घेता येत नाही, असे निदर्शनाला आणून दिल्याने तहकूब केल्याचे सभापती मिस्त्री यांनी सांगितले.
१० कोटींच्या पाईप खरेदीला मंजुरी
By admin | Published: July 13, 2014 1:30 AM