सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात मात्र दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या 47 हजार रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात संचारबंदीनंतर जिल्हाधिकाऱयांनी आता कडक लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. 21 मे ते 1 जूनपर्यंत दहा दिवसांचा लॉकडाऊन असून, किराणा, भाजीपाला व दारू दुकाने बंद ठेवण्यात येणार असून, फक्त घरपोहोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात 17 हजार रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली; परंतु गेल्या 26 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दररोज दोन हजारहून अधिक रुग्ण आढळत असून, 35 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे. दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यांतील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 21 मे ते 1 जून हा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.
ग्रामीण भागातील किराणा साहित्य, भाजीपाला, दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कृषी क्षेत्राशी निगडित दुकाने व इतर सेवांना सकाळी 7 ते 11 चालू ठेवण्यात परवानगी दिली आहे. किराणा साहित्य, भाजीपाला फळे हे फक्त घरपोहोच देण्यात येणार असून, त्यांनाही सकाळी 7 ते 11 हा कालावधी देण्यात आला आहे. सर्व बाजार समित्या, आठवडे बाजार, घाऊक व किरकोळ साहित्य विक्री दुकाने, फेरीवाले, प्रार्थनास्थळे, सभागृह, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहेत.
विनाकारण फिरणाऱयाला 500 रुपये दंड;
वाहनही जप्त होणार
– जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सोलापूर पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून जिह्यात विनाकारण घराबाहेर फिरणाऱयांना 500 रुपये दंड आणि वापरत असलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.