अक्कलकोट : महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक राज्यात पेट्रोल १०, तर डिझेल ९ रुपये प्रतिलीटर स्वस्त मिळत आहे. अक्कलकोट तालुक्यातून बहुतांश वाहनधारक हे कर्नाटक हद्दीतील पंपावर जाऊन स्वस्तात तेल भरताहेत. परिणामी अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्रीयन पंपावरील इंधन विक्रीत घट होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल १२० रुपये ५१ पैसे, तर डिझेल १०३ रुपये २१ पैसे आहे. शेजारील कर्नाटकात पेट्रोल १११ रुपये, तर डिझेल ९५ रुपये आहे. एकंदरीत पेट्रोल १० रुपये, तर डिझेल ९ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. म्हणून सीमावर्ती भागातील गोगाव, खैराट, वागदरी, भोसगे, सिन्नूर, बबलाद, बोरोटी, तोळणूर, हैद्रा, तडवळ, मंगरूळ, शेगाव, आळगी यासह रोज ३० ते ४० गावांतील सर्वच प्रकारची वाहने कर्नाटकात तेल भरणे पसंत करताहेत. परिणामत: अक्कलकोट शहर व परिसरातील पंपावरील तेल विक्री घटली आहे.
सीमावर्ती दहा पंपावर स्वस्त इंधन
सीमावर्ती भागातील कर्नाटकातील मणूर (२), लच्याण (१), बळोरगी (१), हिरोळी (१), मादनहिप्परगा (१) असे दहाहून अधिक पंप सीमावर्ती भागात आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वाहनधारकांना सीमावर्ती भागातील पंप सोयीचे झाले आहेत.
---
मी नागणसूर या सीमावर्ती भागातील रहिवासी आहे. स्वत:ची जीप भाडेतत्त्वावर देत असतो. या व्यवसायात दहा वर्षांपासून सक्रिय आहे. सध्या महाराष्ट्रात कर्नाटकपेक्षा पेट्रोल, डिझेलचे दर जास्त आहेत. यामुळे कर्नाटकातील पंपावर तेल भरतो आहे. महाराष्ट्रात महाग आणि कर्नाटकात स्वस्त कसे, असा प्रश्न पडला आहे.
- इरेशा धनशेट्टी, वाहतूकदार
----
मी २० वर्षांपासून जीप भाड्याने देतो. इंधन दरातील फरक जाणवत आहे. मात्र, पहिल्यांदाच असे घडले आहे की, महाराष्ट्रपेक्षा स्वस्त पेट्रोल, डिझेल कर्नाटकात मिळत आहे. यामुळे दुधनी भागातील कर्नाटकच्या पंपावर नियमित डिझेल भरत आहे.
- बाबुशा जकापुरे, जीप वाहतूक, मैंदर्गी