सोलापूर : माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह सासरच्या नऊ जणांविरुद्ध एका उच्चशिक्षित महिलेने फिर्याद दाखल केल्यावरुन परभणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीस नाझरे (ता. सांगोला) येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. हा प्रकार ६ जून २०१४ ते १७ डिसेंबर २०१७ दरम्यान घडला. प्रणिता उर्फ सोनी दीपक शिंदे (वय २५, रा. शेखराजूर, ता. पालम, जि. पभरणी) या विवाहितेने नानलपेठ (जि. परभणी) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणी आरोपी पती दीपक अशोक शिंदे (वय ३२, रा. नाझरे ता. सांगोला, जि. सोलापूर), सासरा अशोक विठ्ठल शिंदे (वय ६२), सासू कोंडाबाई अशोक शिंदे (५४),नणंद श्यामबाला अशोक शिंदे (वय २९), दीर दिनेश अशोक शिंदे (२७),दीर महेश अशोक शिंदे (वय २५, सर्व रा. घनसरगाव, ता. रेणापूर, जि. लातूर),चुलत दीर गोपाळ चंदर शिंदे (वय ४३), चुलत जाऊ मंजू गोपाळ शिंदे (वय ३४, रा. नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) व लता बालाजी भोसले (वय ३२ रा. मरखेल, ता. देगलूर, जि. नांदेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पती दिपक शिंदे हा नाझरे येथे एका संस्थेत शिक्षक म्हणून काम करत आहे. लग्नात कमी हुंडा दिला आहे, मला नोकरी आहे, कुणीही १५ लाख रुपये हुंडा दिला असता असे म्हणून पत्नी प्रणितास माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून आरोपी पतीने तिचा छळ केला. तसेच पती, सासू आणि नणंद व दीर यांनी मिळून तिला मारहाण करून कोंडून ठेवले. ही बाब प्रणिताने तिच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर तिचे आई-वडील आणि मामा हे सासरी येऊन त्यांची समजूत काढली. आताच लग्न केले आहे, तुम्हाला देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगत मुलीला चांगले नांदवा, अशी विनंती करून निघून गेले. तरीही आरोपींनी प्रणिताचा छळ सुरूच ठेवला.