- संताजी शिंदे
सोलापूर: घरामध्ये आईच्या मोबाइलवरून इंस्टाग्रामवर शेजारी राहणाऱ्या महिलेचा फोटो पोस्ट केला. फोटोखाली 'इसको कॉल करो' असे टाइप करून तिचा मोबाइल नंबर टाकला. त्यानंतर मात्र महिलेला दिल्ली, युपी-बिहारपासून अनेक ठिकाणाहून फोन येऊ लागले. महिला हैराण झाली, सायबरने तपास केला असता फोटो टाकणारा शेजारचाच १० वर्षांचा मुलगा निघाला.
शहरातील एका नगरात घरामध्ये १० वर्षांचा मुलगा नेहमी गेम खेळण्यासाठी आईचा मोबाइल घेत होता. मुलगा गेम खेळतो म्हणून आई त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. मात्र, सतत मोबाइल हातात असल्याने तो इंस्टाग्रामवरचे विविध रिल्स पाहत होता. रिल्सप्रमाणे आपणही काहीतरी पोस्ट करू असे त्याच्या मनात आले.
एके दिवशी त्याने घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेचा फोटो काढला. मुलगा १० वर्षांचा असल्याने शेजारच्या महिलेनेही लक्ष दिले नाही. मुलाने इंस्टाग्रामवर रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर महिलेचा सुंदर फोटो त्याने पोस्ट केला अन् त्याखाली "इसको कॉल करो' असा संदेश टाकला. महिलेचा फोटो इंस्टाग्रामवरून व्हायरल झाला अन् तिच्या मोबाइलवर फोन येण्यास सुरुवात झाली.
असा झाला उलगडा-
सायबर सेलमध्ये पोलिस उपनिरीक्षक अविनाश नळेगावकर यांच्या समोरच एका व्यक्तीचा फोन आला. फोन नळेगावकर यांनी उचलला अन् समोरील व्यक्तीला मी सायबर सेलमधून पीएसआय बोलतो असे हिंदीत सांगितले. नळेगावकर यांनी तुला नंबर कोठून मिळाला असे विचारले, त्यावर त्याने इंस्टाग्रामवरील पोस्ट स्क्रीन शॉट काढून पाठवली.
पोलिसांनी इंस्टाग्रमचा 2 नंबर पाहून त्यावर कॉल केला, तेव्हा तो संबंधित महिलेच्या घराशेजारचाच निघाला. त्यांना बोलावून चौकशी केली असता, शेजारच्या महिलेने काही कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र, माझा १० वर्षांचा मुलगा सतत मोबाइलवर गेम खेळतो असे सांगितले. मुलाकडे विचारणा केली असता त्याने पोस्ट टाकल्याचे सांगितले. १५ ते २० दिवस महिलेला त्रास झाला. मात्र, त्यांनी लहान मूल आहे म्हणून तक्रार दिली नाही.
एका महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते : शौकत सय्यद
पोस्ट टाकलेल्या महिलेचे कुटुंबीय सुशिक्षित होते, त्यामुळे त्यांनी समजून घेतलं अन्यथा दुसरे कोणी असते तर महिलेवरच संशय घेऊन तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. लहान मुलांच्या हातात मोबाइल देणे धोक्याचे आहे, अशा प्रकरणात आई-वडिलांवर सायबर गुन्ह्याप्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती पोलिस निरीक्षक शौकत सय्यद यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
मेसेज महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशहून
तू कुठे राहते, तुला भेटायला येऊ का, किती पैसे देऊ? भेटायला कधी येते असे अनेक अश्लील बोलणारे फोन येऊ लागले. अश्लील मॅसेज येऊ लागले. महिलेला काही कळेना, हे असं कसं होतंय इतके फोन कसे येत आहेत, असा प्रश्न पडला. फोन व मेसेज महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी ठिकाणाहून येऊ लागले. शेवटी महिलेने सायबर सेलकडे धाव घेतली.
कॅनडाचा असल्याचे सांगून सोलापूरचा तरुण करत होता चॅटींग
कॅनडा येथील रहिवासी असल्याचे भासवून सोलापुरातील एक तरुण परदेशातील मुलींशी चॅटींग करीत होता. वय वर्ष ३२ असताना तो स्वतःचे वय १७ असल्याचे सांगून मुलींशी मैत्री करीत होता. चॅटींगवर तो परदेशातील मुलींशी अश्लील कृत्य करीत होता, हा प्रकार दिल्ली येथील चॅन्स सर्चच्या टीपलाईनमध्ये निदर्शनास आला. याची माहिती सोलापूरच्या सायबर सेलला समजली, त्यांनी तत्काळ तरुणाला ताब्यात घेतले. तरुण वैफल्यग्रस्त होता, त्यामुळे मोबाईलवर तो असे प्रकार करीत होता. सायबर पोलिसांनी त्याला तुझ्या विरुद्ध जर तक्रार आली तर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. सायबर अंतर्गत कारवाई होऊ शकते असे सांगितले. त्यानंतर त्याने हा प्रकार बंद केला.