सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेच्या समस्येवर जमिअत उलमा-ए-हिंद सोलापूर शाखेतर्फे वक्फ बोर्डाचे चेअरमन आ.डॉ वजाहत मिर्झा यांच्याशी विविध प्रश्नावर व वक्फ मालमत्तेच्या समस्या जाणून घेण्यासाठी महत्त्वाची बैठक मौलाना हारीस ईशाअती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रास्ताविक करताना जन.सेक्रेटरी हसीब नदाफ यांनी राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेचे असंख्य प्रश्न मांडले.
सोलापुरातील वक्फ मालमत्तेवर जाणीवपूर्वक महानगरपालिकेने आपल्या विकास आराखड्यात आरक्षणे टाकली आहेत ती हटवण्यात यावीत, त्याचबरोबर विभागवार न्यायासने स्थापन करावीत, जिल्हा पातळीवर मंजूर झालेले वक्फ कार्यालय सुरू करावे, कर्नाटकाच्या धर्तीवर वक्फ मंडळास शंभर कोटी रुपये अनुदान द्यावे, वक्त जमिनीवरील शासनाचे अतिक्रमण हटवून सदर जमीनीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावेत, सोलापुरातील हाशमपीर मस्जिद व अनाधिकृत भाडेकरू यांच्या न्यायालयीन वादाचा उपयोग करून हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्यासाठी होत आहे. त्याबाबत अधिकृत वक्फ बोर्डाने सत्य निवेदन प्रसिद्ध करावे वक्फ रजिस्ट्रेशन करताना नाममात्र फी आकारावी, वक्फ मंडळाला कायमस्वरूपी कार्यकारी अधिकारी शासनाने नेमावा, अश्या असंख्य समस्या यावेळी मांडण्यात आल्या.
या सर्व समस्यांवर शासनाकडे त्वरित पाठपुरावा करेन त्याचबरोबर वक्फ मंडळाकडे प्रलंबित समस्या बाबत त्वरित कृती कार्यक्रम करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी सोलापूर शहर व जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेच्या ट्रस्टींच्या समस्या व्यक्तिगत पातळीवर मांडण्याची संधी दिली.व त्यांचे लिखित निवेदन स्वीकारले. १४ एप्रिल२०२४ रोजी मुंबई येथे जमिअत उलमा-ए-हिंदच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व वक्फ अधिकारी यांची बैठक आयोजित करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सदर समस्या बाबत जमीअत पाठपुरावा करेल.व सोलापुरातील वक्फ मालमत्ता सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व त्यांचा उपयोग समाजासाठी होण्यासाठी समाजाच्या प्रमुख मान्यवरांनी सतर्क राहावे व कृतीशील योगदान द्यावे असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात मौलाना हारीस ईशाअती यांनी केले.मौलाना तैय्यब यांनी सूत्रसंचालन केले.