सोलापूर : मागील काही दिवसांपासून एसटी सेवा ही पूर्वपदावर येत आहे. परिणामी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात एसटी गाड्या धावत आहेत. यामुळे काही वेळा अपघातही होत आहेत. सोलापूर विभागात हे अपघाताचे प्रमाण खूप कमी असून मागील जवळपास वर्षभरात जवळपास १७ अपघात झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे दिवसेंदिवस एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांचा संप मिटला. त्यानंतर एसटी गाड्या मोठ्या प्रमाणात धावत आहेत. यामुळे खासगी गाड्यांकडे वळालेले प्रवासी पुन्हा एसटी स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवाय आता रस्तेही खड्डेविरहित होत असल्यामुळे सर्वच गाड्या सुसाट धावत आहेत. यातूनच काही वेळा अपघात होत आहेत. एसटीचे अपघात जरी झाल्यास प्रवाशांना मात्र त्याची भरपाई मिळत असते; पण अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकाला दहा लाख रुपयांची मदत मिळते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
वर्षातून एकदा होते चालकांची नेत्र तपासणी
एसटीचा अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारे काळजी घेतली जाते. प्रत्येकवर्षी चालकांची नेत्र तपासणी केली जाते. या तपासणी अंतर्गत काही चालकांना दृष्टीदोष असल्यास त्यांच्यावर तत्काळ इलाज केले जातात.
----------
अपघात झाल्यास तत्पूर्ती एक हजाराची मदत
एसटीमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुरक्षितता वाटते. जर अपघात झाल्यास एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना तात्पुरती एक हजार रुपये मदत दिली जाते. त्यानंतर जर प्रवाशाने इतर खासगी ठिकाणी उपचार घेतल्यास आणि तो खर्च एसटी महामंडळाकडे जमा केल्यास प्रवाशाला ती रक्कम मिळते. शिवाय जर अपघातात पादचारी जरी जखमी झाला तरी त्यालाही प्रशासनाकडून मदत मिळते.
चालकांना मिळते उजळणी प्रशिक्षण
एखाद्या कर्मचाऱ्याकडून अपघात झाल्यास त्या अपघाताच्या स्थितीवरून कर्मचाऱ्याला उजळणी प्रशिक्षण देऊनच कामावर पुन्हा घेतले जाते. चालकाच्या हातून अपघात जरी झाला नसला तरी भविष्यात त्याच्याकडून अपघात होऊ नये यासाठी त्यांना वर्षातून एकदा तरी उजळणी प्रशिक्षण दिले जाते.
-----------
एसटी गाड्या ८० वर स्पीड लॉक
एसटीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. यामुळे प्रत्येक लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या ८० स्पीड लॉक केल्या जातात. यामुळे अनेकवेळा इतर वाहने एसटीला ओव्हरटेक करून जातात, यामुळे प्रवासी कधी कधी एसटी हळू धावते, अशीही तक्रार करत असतात; पण स्पीड लॉक केल्यामुळे अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
आपल्या विभागात कर्मचाऱ्यांना वारंवार ट्रेनिंग दिले जाते. यामुळे विभागात अपघाताची संख्या कमी आहे. शिवाय अपघात झाल्यास चालकांचे समुपदेशन करून त्यांना उजळणी प्रशिक्षण देऊनच त्यांना कामावर हजर केले जाते.
- सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी