बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : मागील दोन वर्षात सोलापूर आगारातील शंभर एसटी गाड्या स्क्रॅप झाल्या असून याबदल्यात नवीन गाड्या आलेल्या नाहीत. प्रवाशांच्या गरजेनूसार सोलापूर विभागाला तीनशे नवीन एसट्यांची आवश्यकता आहे. तशी मागणी एसटी महामंडळाकडे केल्याची माहिती सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली आहे.
आगारात एसटी गाड्यांची रोज तपासणी होते. ज्या गाड्या प्रवास योग्य नाहीत, अशा गाड्या महामंडळाच्या परवानगीने स्क्रॅप होतात. दोन वर्षात शंभर गाड्या स्क्रॅप झाल्या असून तीस गाड्या मालवाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत. पूर्वी सोलापुरात आगारात ७८० गाड्या होत्या. आता साडे सहाशे गाड्यांचा वापर प्रवासाकरीता होत आहे. वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता अजून सोलापूरला तीनशेहून अधिक गाड्या लागतील. कोरोनामुळे एसटी महामंडळाचे बजेट कोलमडले. त्यामुळे नवीन गाड्या खरेदी करता आल्या नाहीत. अलीकडच्या काळात एसटी महामंडळाची परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. सुरुवातीला आषाढ वारी, त्यानंतर श्रावण आणि आता गणेशोत्सव या उत्सव काळात एसटीचे उत्पन्न पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे भविष्यात नवीन गाड्यांची खरेदी होवू शकते. तुर्त आहे त्या गाड्यांमध्ये नियोजन करताना सोलापूर विभागाची दमछाक होत आहे.