शीतलकुमार कांबळे, सोलापूर : जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील शंभर मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे पदोन्नतीने पुढील महिन्यात भरण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली.
जिल्ह्यात ४ शिक्षण विस्तार अधिकारी, १९९ पैकी १७८ केंद्रप्रमुख आणि शंभर मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. या जागा प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नतीने भराव्यात यासाठी शिक्षक संघटनांकडून मागणी होत आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून प्रथम मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्यात येतील. त्यानंतर केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत.
अनेक शिक्षक हे सेवानिवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संप, मार्च अखेरमुळे शिक्षकांच्या पदोन्नतीस विलंब होत आहे. परंतु, पुढील महिन्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांच्या रिक्त जागी पदोन्नतीने नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जावीर यांनी सांगितले.शिक्षक संघटनांचे आंदोलन
जिल्ह्यात शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे पदोन्नतीने तत्काळ भरावीत, अन्यथा ५ एप्रिलपासून चक्रीउपोषण करण्याचा इशारा गुरुसेवा परिवाराने शिक्षण विभागाला दिला होता. आता एप्रिल महिन्यात भरती होत असल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"