- इरफान शेखकुर्डूवाडी (जि. सोलापूर) : इथं माणसंच काय, पण जनावरांचंही कामासाठी स्थलांतर झालंय. गावातील १०० कुटुंबं पाण्यापायी गाव सोडून कामाच्या शोधात शहरात गेलीत. जनावरांनाही आपल्या पाहुण्यांकडे सांभाळायला सोडलंय. उसाचे क्षेत्र आता राहिलंच नाही. फळबागा जळाल्यात. दूध संकलन निम्म्याने घटलंय, सांगा आम्ही जगायचे कसे?, माढा तालुक्यातील अंजनगाव (खे) येथील गावकऱ्याचा हा प्रश्न.काही तरुण, वृद्ध खेलोबाच्या मंदिरात बसले होते. अंजनगाव खेलोबाची लोकसंख्या ४ हजार ६१७. येथे सुमारे ९३९ कुटुंबांसाठी शासनाने केवळ २ टँकरच्या ४ खेपा दिल्या आहेत. त्यातूनच ग्रामस्थ पाण्याचे कसेबसे नियोजन करीत आहेत.गावात सुमारे १६० विहिरी असून दोन हजार बोअर आहेत; मात्र सर्वांनी तळ गाठलाय. गावात मोठे पशु दोन हजार तर लहान अडीच हजार आहेत. त्यातून एका वेळेस १० हजार लिटर दूध संकलन होते; मात्र ते प्रमाण आता निम्म्यावरच आले आहे, असे उपसरपंच भागवत चौगुले यांनी सांगितले.
पाण्यासाठी १०० कुटुंबांनी सोडलं गाव, अंजनगावची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 1:57 AM