सोलापूर : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा रिक्त ठेवण्यात येतात. सोलापूर जिल्ह्यातून ३२९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केलेली होती, यापैकी १०१ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यांने आरटीई अंतर्गत प्रवेश घेतला नाही यामुळे ज्या शाळांमध्ये प्रवेश झालेले नाहीत त्याचे कारण शोधून त्या शाळांमध्ये सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी पालकांकडून होत आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ३२९ शाळांमधून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. यातील ३२ शाळा अशा आहेत त्यात प्रवेशासाठी एकाही पालकाने अर्ज केला नाही तर ६९ शाळा अशा आहेत की ज्यामध्ये प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित पाल्याचा नंबर त्या शाळेत लागला नाही किंवा त्या शाळेत प्रवेश घेतलेला नाही़ यामुळे अशा शाळांमध्ये प्रवेश का होत नाहीत याची माहिती घेऊन पुढील उपाययोजना करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे़ फेब्रुवारीपासून आरटीई अंतर्गत सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया नुकतीच संपली असून सोलापूर जिल्ह्यातून जवळपास ८५ टक्के म्हणजेच २३६२ जागांपैकी २००५ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. म्हणजेच ३५७ जागा मात्र शेवटच्या दिवसांपर्यंत रिक्त राहिल्या आहेत.
------------
प्रवेश न झालेल्या शाळांची यादी तालुक्यानुसार
तालुका प्रवेश न झालेल्या शाळांची संख्या
- अक्कलकोट ३
- बार्शी ३
- करमाळा ४
- माढा १२
- माळशिरस २६
- मंगळवेढा १२
- पंढरपूर २२
- सांगोला १३
- उत्तर सोलापूर ३
- दक्षिण सोलापूर ३
जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश झालेले नाहीत त्यांचे कारण शोधण्यात येईल़ याबाबत पालकांकडूनही प्रतिक्रिया आम्ही घेऊन पुढील काळात सर्व्हे करू. पुढील वर्षी आरटीई अंतर्गत जास्तीतजास्त प्रवेश होतील याकडे आम्ही लक्ष देऊ.
- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी