ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१ - सोलापूर शहरात ब-याच प्रतिक्षेनंतर बुधवारी रात्री १०६ मि. मी. पाऊस पडला. जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाल्याचे वृत्त असून, अक्कलकोट येथील ऐतिहासिक हत्ती तलाव, बोरामणीतील पाझर तलाव, मोहोळ तालुक्यातील येवती तलाव भरला आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. नुसतेच ढग येऊन जात. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. दिवसभर भणाणणारा वाºयामुळे धुळीचे लोट उडत होते. यंदाही दुष्काळ पडणार का अशी शेतक-यांमध्ये भीती निर्माण झाली होती. सीनेचे पात्र कोरडे ठणठणीत असून, दोन्ही किनाºयावर कोठेही हिरवळ दिसत नाही. यामुळे स्थिती चिंताजनक असतानाच बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुष्य नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली.
सोलापुरात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १0६ मि. मी. पाऊस पडल्याची हवामान खात्याकडे नोंद झाली. याचबरोबर मोहोळ, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, माढा, माळशिरस, करमाळा तालुक्यात सर्वदूर हा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यात जलाशये भरण्यात इतपत अद्यापपर्यंत पाऊस झालेला नव्हता. पुष्य नक्षत्राच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाची संततधार रात्रभर सुरू राहिल्याने चांगला भीज पाऊस झाला.
ज्या ठिकाणी खरिपाची पेरणी झाली आहे, त्या पिकांना जीवदान मिळाले आहे. अक्कलकोट तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. रात्रभराच्या पावसाने ऐतिहासिक हत्ती तलाव भरला आहे. मोहोळ तालुक्यातील येवती, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, मंद्रुप येथील तलावात पाणी आले आहे. जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची गरज आहे. उजनी धरण क्षेत्रातही मोठ्या पावसाची गरज आहे. धरणात पाणीसाठा अत्यल्प आहे.
चार दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाने धरणात काही प्रमाणात पाणी आले आहे. पण आषाढी वारी व सोलापूर शहराला पिण्यासाठी भीमेत ४ टीएमसी पाणी सोडावे लागले आहे. औज व चिंचपूर बंधारा या पाण्याने भरून घेण्यात आल्याने सोलापूर शहराची तीन महिन्याची पाण्याची चिंता मिटली आहे.