सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २० नोव्हेंबरपासून या परीक्षा होणार असल्याने यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षकांना तीन दिवसांच्या सुटीनंतर पुन्हा कामावर बोलावले आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावी ऑक्टोबर परीक्षेचे वेळापत्रक पाठविले आहे. २0 नोव्हेंबरपासून या परीक्षेला सुरूवात होईल. विद्यार्थी संख्या कमी असली तरी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्याची व्यवस्था शिक्षण विभागाला करावी लागणार आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र आहे, अशा ठिकाणी सॅनिटायझर, परीक्षार्थीमधील फिजिकल डिस्टन्स, मास्क, परीक्षा केंद्रात जाताना थर्मल गनद्वारे तपासणी, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांची चाचणी या सर्व सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे.
या तयारीसाठी परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्यांना तीन दिवस आधी बोलाविले जाणार आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवार सणाची सुटी उपभोगल्यानंतर या शिक्षकांना परीक्षेच्या जबाबदारीसाठी यावे लागणार आहे. कोरोनाच्या साथीमध्ये आवश्यक त्या सूचनांचे पालन करीत ही परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी शिक्षण विभागावर आहे.
शाळांकडून होत आहे विचारणा
शिक्षण व क्रीडा विभागाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा असे यात म्हटले आहे. कोरोना सुरक्षेसाठी शाळेत कोणती तयारी करावी लागेल याबाबत शाळांमधून आरोग्य विभागाकडे विचारणा होत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.