मोडनिंब : मोडनिंब येथील कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरू केलेल्या सेंटरमध्ये अरण मोडनिंब व भेंड येथील १४ वर्षांच्या आतील ११ लहान मुले कोरोनाबाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. उपचारप्रणालीबरोबर योगासन, प्राणायामचा आधार घेत कोरोनाशी लढा देत आहेत.
दहा दिवसांत मोडनिंब कोरोना सेंटरमध्ये १४ वर्षांच्या आतील ११ मुले उपचारासाठी दाखल झाली. यामध्ये अरण येथून सात, मोडनिंब येथून तीन तर भेंड येथून एक मुलगा उपचारासाठी दाखल झाला. तिसऱ्या लाटेत १५ वर्षांच्या आतील मुले सर्वाधिक बाधित होतील अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांतून व्यक्त केली जात असताना तत्पूर्वीच तीन गावांतून ११ मुले कोरोनाबाधित निघाली. सध्या मोडनिंबच्या सेंटरमध्ये ही सर्व मुले उपचार घेत आहेत. डॉ. प्रदीप पाटील, डॉ. शरद थोरात हे या मुलांवर उपचार करीत आहेत.
--
लहान मुलांसाठी सेंटर उभारा
तिसऱ्या लाटेपूर्वीच मोडनिंब सेंटरवर दहा दिवसांत ११ मुले उपचारासाठी आल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. माढा तालुक्यात काही ठिकाणी लहान मुलांसाठी स्वतंत्र डेडिकेटेड सेंटर उभे करण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.
---
तीन मुले झाले बरे
या ११ पैकी तीन मुलांना बुधवारीच घरी सोडण्यात आले. योगासनाबरोबर आयुर्वेदिक काढा आणि योगासन, प्राणायामचा फायदा झाला. लवकरात लवकर या आजारातून बाहेर पडण्यास मदत झाली. हीच आरोग्यप्रणाली तिसऱ्या लाटेतील मुलांना तारील, असा विश्वास येथे उपचार करणारे डॉ. प्रदीप पाटील आणि डॉ. शरद थोरात यांनी व्यक्त केला.