अप्पासाहेब पाटील।
सोलापूर : सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेने त्रस्त झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना आता यापुढे उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (एच़व्ही़डी़एस.) वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ याच मोहिमेतून प्रत्येक नवीन कृषीपंप जोडणी घेणाºया सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ८७८ ग्राहकांना एक ट्रान्स्फार्मऱ़़ एक शेतकरी या धर्तीवर वीजजोडणी देण्यात येणार आहे़ यासाठी २७६ कोटी रूपयांचे टेंडर मंजूर झाल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे.
सातत्याने होणारा वीजपुरवठ्यातील खंड, विजेची होणारी चोरी, नियमित होणारे अपघात, एका ट्रान्स्फार्मरवरून १५ ते २० जोडण्या देण्यात आल्या आहेत़ ट्रान्स्फार्मरची क्षमता कमी अन् जोडण्या जास्त अशी अवस्था झाली आहे़ यामुळे ट्रान्स्फार्मरवरील दाब वाढून तो बंद पडण्याच्या घटना घडण्याबरोबर अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे़ वारंवार खंडित वीजपुरवठा यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती समोर आली.
या वारंवार घडणाºया घटनांवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने मे २०१८ मध्ये उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्याची योजना आखली़ त्यानुसार आतापर्यंत राज्यात २़६ लाख कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे़ याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ८७८ ग्राहकांना वीजजोडणी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ यात १० केव्ही, १६ केव्ही व २५ केव्ही या क्षमतेचे ट्रान्स्फार्मर बसविण्यात येणार आहेत़ यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली़ सोलापूर जिल्ह्यात २०१४ पासून कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात आली नाही़ २०१४ पासून आजतागायत ११ हजार ८७८ कृषीपंप ग्राहकांनी महावितरणकडे रितसर अर्ज करून कोटेशन भरले आहे़ अशा वीजजोडणी प्रलंबित ग्राहकांना प्राधान्याने एक ट्रान्स्फार्मऱ़़़एक शेतकरी या धर्तीवर वीजजोडणी देण्यात येणार आहे.
विभाग निहाय जोडणी- सोलापूर ग्रामीण - ११७७- पंढरपूर - २२३२- बार्शी - ५६९२- अकलूज - ११७७
शेतीपंपाची २५ हजार कोटी थकले...- राज्यात २ कोटी १० लाख ग्राहक आहेत़ राज्यात सातत्याने पडणाºया दुष्काळामुळे शेतकºयांची उत्पादन क्षमता कमी झाली आहे़ याशिवाय उत्पादकता कमी झाल्याने अर्थकारण बिघडले आहे़ त्यामुळे राज्यात शेतीपंपांच्या थकबाकीचा आकडा २५ हजार कोटींवर पोहोचला आहे़ अशात यावर्षी शासनाने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ जाहीर केला आहे़ यामुळे शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीला स्थगिती दिली आहे़ तरीही शेतीपंपाला सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे सांगितले़
विजेची हानी टाळण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे जोडण्या देण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील ११ हजार ८७८ कृषीपंप ग्राहकांचा त्यात समावेश आहे़ यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, मोहोळ व टेंभुर्णी येथे सुरुवातीचे दोन कनेक्शन देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील ग्राहकांना या प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्यात येणार आहे़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर