बार्शी : तालुक्यातील ११५ ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या असून, जिल्ह्यात बार्शी तालुक्याने आघाडी घेतल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील ४०२ पेपरलेस ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ११५ पेपरलेस ग्रामपंचायती बार्शी तालुक्यातील आहेत. ग्रामपंचायती पेपरलेस करण्याच्या धोरणांतर्गत ग्रामपंचायतीचे १ ते २३ नमुने रेकॉर्ड तसेच ग्रामपंचायतचे नमुना नंबर आठ (मालमत्ता नोंदी) व नमुना नंबर नऊ (कर मागणी यादी) संगणकीकृत केले आहेत. यामुळे सर्व प्रकारचे दाखले, उतारे तसेच अहवाल संगणकीकृत मिळू शकतात तसेच कर मागणी बिलेसुद्धा संगणकीकृत होऊन कामात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.
सेवा हमी कायदा तसेच माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे. तसेच वेळेची बचत होऊन कामाची गती वाढण्यास मदत होणार आहे. पंचायत समिती सभापती कविता वाघमारे, उपसभापती अविनाश मांजरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, तालुका व्यवस्थापक, सरपंच, ग्रामसेवक, केंद्रचालक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायती कमी कालावधीत जास्त संख्येने पेपरलेस करता आल्या.