सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळे या अधिकार मंडळांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असून पदवीधरच्या दहा जागांसाठी ११८ तर शिक्षकांच्या १० जागांसाठी ३० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल करण्यासाठी विद्यापीठात उमेदवारांची गर्दी झाली होती.
या निवडणुकांसाठी विविध प्राध्यापक संघटनांनी जोरदार तयारी केली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करतायेत. अधिसभेच्या प्राचार्य मतदारसंघातून १० जागांसाठी ९ अर्ज, संस्था प्रतिनिधी ६ जागांसाठी ११, शिक्षकांच्या १० जागांसाठी ३० अर्ज, पदवीधर मतदारमधून-१० जागांसाठी तब्बल ११८ उमेदवारी अर्ज तर विद्यापीठ शिक्षकमधून ३ जागांसाठी पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. विद्यापरिषदेच्या आठ जागांसाठी नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर अभ्यासमंडळाच्या आंतरविद्या शाखेसाठी ९, कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी १२, मानवविज्ञान विद्याशाखेसाठी ३१ तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्यासाकेसाठी तब्बल ४५ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
१६ रोजी सायंकाळी पाच पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. १७ रोजी उमेदवारी अर्जावर आवश्यक असल्यास माननीय कुलगुरूंकडे अपील करता येणार आहे. रविवार, १८ रोजी पात्र उमेदवारांच्या नावाचे नोटिफिकेशन निवडणूक पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानुसार २९ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत शहर व जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ३० सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर पर्यंत मतमोजणी होणार आहे.