सांगोला : मागेल त्याला शेततळे या योजनेतून तालुक्यातील १४ फेब्रुवारीपर्यंत चार टप्प्यात सुमारे ८७ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. एकूण ११८ शेतकºयांनी शेततळ्याची कामे पूर्ण केली असून ५९ लाख रुपयांचे अनुदान मागणीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहेत. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकºयांना अनुदान वाटप केले जाईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली.
सांगोला तालुक्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमच भेडसावत राहिल्याने शेतकºयांचा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेततळे घेण्याकडे कल वाढत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यात नेहमीच पाऊसमान कमी राहिल्याने दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकरी शेतात जिथे पाणी लागेल अशा ठिकाणी विंधन विहिरी, विहिरीची खोदाई करुन पाण्यासाठी धडपडत आहेत. विंधन विहीर किंवा विहीर खोदूनही शेतीला पाणी कमीच पडत आहे. म्हणूनच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकºयांनी शेततळी घेण्यावर अधिक भर दिला आहे.
शासनाच्या विविध योजनांसह मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेतकºयांनी आपापल्या शेतात ४० बाय ४०, ६० बाय ६०, १०० बाय १०० अशा लांबी-रुंदी-खोलीची शेततळी तयार करुन कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा तयार केला आहे. शेतकरी आता हेच पाणी शेतातील उभी पिके, फळबागांना देऊन पाणीटंचाईवर मात करीत आहेत. शेततळ्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील फळबागा जोपासल्याने शेतकºयांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास मदतही होत आहे. त्यामुळे शेततळी हाच शेतकºयांचा जीवनातील अविभाज्य घटक बनत चालला आहे.
तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान व गळीत धान्य अभियानासह शेतकºयांनी स्वखर्चातून हजारो शेततळ्यांची कामे पूर्ण केल्याची माहिती दीपाली जाधव यांनी दिली़
शेततळ्यात आघाडी घेतलेली गावे- शेततळी घेण्याच्या बाबतीत सांगोला तालुक्यातील अजनाळे, य. मंगेवाडी, वाकी-शिवणे, शिवणे, महुद, खिलारवाडी, गायगव्हाण, चिकमहुद, हलदहिवडी, शिरभावी, संगेवाडी, अकोला, कडलास, वाढेगाव ही गावे आघाडीवर आहेत, असे दीपाली जाधव यांनी सांगितले़