सोलापूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागासह कर्नाटक व तेलंगणा मधून भाविकांचे पंढरीत आगमन होत आहेत. जवळपास पंढरपुरात १० ते १२ लाख भाविक दाखल झाले आहे. दर्शन रांग १० नंबर शेडच्या पुढे गेली असून दर्शनासाठी १८ ते २० तास लागत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. मुखदर्शनाचीही रांग लांबपर्यंत गेली आहे.
आज सायंकाळी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आज सायंकाळी पंढरपूर शहरात दाखल होणार आहेत. पंढरपुरातील भीमा नदीकाठावरही वारकरी मोठया प्रमाणात दाखल झाले आहेत. सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व अन्य जिल्ह्यातील पोलीसांनी चांगला बंदोबस्त ठेवल्याने वाहतूकीचा कोणताही अडथळा निर्माण होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
पंढरपुरातील सर्व रस्ते हाऊसफुल्ल झाले असून सर्व रस्ते वारकरी व भगव्या पताकांनी व्यापून गेले आहेत. याशिवाय रेल्वे, एसटी व आपल्या खासगी वाहनातून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनाने पंढरपूर मधील गर्दी वाढली आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसर, भक्ती सागर (६५ एकर), प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, पत्रा शेड दर्शन रांग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.