आरोग्य विभागातील डॉक्टरपासून ते अंगणवाडी सेविकांपर्यंत सर्वांनीच कोरोना काळात सर्वात पुढे होऊन लढा दिला. त्यामुळे कोरोना लस देण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी फ्रंटलाईनवर असलेल्या आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
कोरोनाची लस आल्यानंतर लसीकरणाला कधी सुरूवात होईल, याकडे संपूर्ण देशाच लक्ष लागून होते. मात्र आता प्रतिक्षा संपली आहे. येत्या १६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या सांगोला तालुक्यातील आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.
एका महिन्याच्या अंतराने दुसरी लस
कोरोना लसीची एक बॉटल १५ मिलीची असून एका व्यक्तीला ०.५ मिलीचा डोस दिला जाणार आहे. एका बॉटलमध्ये दहा जणांना कोरोना लस देण्यात येणार आहे. एखादी व्यक्ती उजव्या हाताने काम करीत असेल तर तिच्या डाव्या हाताच्या दंडावर लस दिली जाणार आहे. जर एखादी व्यक्ती डाव्या हाताने काम करत असेल तर तिच्या उजव्या हातावर लस दिली जाणार आहे. विशेषतः लस घेतल्यानंतर एका महिन्याच्या अंतराने संबंधिताला दुसरी लस दिली जाणार आहे.