महिला व बालकल्याण विभागामार्फत शासनाकडील आदर्श अंगणवाडी योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १०० अंगणवाडी केंद्रांची स्मार्ट अंगणवाडी कीटसाठी निवड केली आहे. अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट कीट अंतर्गत एलईडी टीव्ही, सोलर लाईटींग सिस्टीम, ई-लर्निंग सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत कीट, वॉटर प्युरिफायर, हँडवॉश बेसिन, एज्युकेशनल पेंटींग चार्टस आदी साहित्य मिळणार आहे.
सन २०२१-२२ मध्ये सर्वाधिक १३ कोटी ७० लाख रुपयांचा निधी अंगणवाडी इमारत बांधकाम व दुरुस्ती कामांसाठी मिळवण्यास विभागाला यश मिळाले आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात २०८ अंगणवाडी बांधकामे व ९३७ अंगणवाडी दुरुस्तीची कामे मंजूर केली आहेत. जिल्हा परिषद सेसमधून महिलांना व्यवसायाभिमुख साहित्य पुरवून त्यांचे जीवनमान उंचावणे, माध्यमिक, उच्च माध्यमिकमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना संगणकीय प्रशिक्षणाव्दारे तांत्रिक कौशल्य वृध्दी करणे आदी कामे होणार आहेत.
स्मार्ट कीटसाठी अंगणवाडी केंद्रे
सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, महिला बालकल्याण सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय स्मार्ट कीटसाठी अक्कलकोट ११, बार्शी १०, करमाळा ८, माढा ९, माळशिरस १३, मोहोळ ९, मंगळवेढा ८, उत्तर सोलापूर ४, पंढरपूर ९, सांगोला ११, दक्षिण सोलापूर ८ अशा १०० अंगणवाडी केंद्रांची निवड केल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी दिली.