ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३ - उजनी धरणातील पाणी वेगाने खाली जात असल्याने दुबार पंपिंग व अन्य कामासाठी महापालिकेतर्फे साडेतेरा कोटींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रेड्डी यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली.
स्थायी समितीची सभा सभापती रियाज हुंडेकरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत औज बंधार्यातील पाणीसाठा संपत आल्याने निर्माण होणार्या संभाव्य पाणीटंचाईवर आनंद चंदनशिवे, शशीकला बत्तुल यांनी लक्षवेधी केली. याला उत्तर देताना अभियंता रेड्डी यांनी सहा महिन्याचा टंचाई आराखडा तयार केल्याचे सांगितले. मंत्रालयात सोमवारी पाणीटंचाईवर आढावा बैठक होणार असल्याने यावेळी शासनाकडे सात कोटींची मागणी केली जाणार आहे.
त्यानंतर शन २0१६—१७ या वर्षासाठी पाणीपट्टी दरात २७ टक्के दरवाढ करण्यास मान्यता मिळण्यासाठी आयुक्तांकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. या प्रस्तावाला सर्वांनी विरोध केला. अंदाजपत्रकातच पाणीपट्टी पन्नास टक्के माफ करण्यासाठी रकमेची तरतूद केल्याने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर सभापती हुंडेकरी यांनी हा प्रस्ताव एकमताने दप्परी दाखल करण्याचा आदेश दिला. शहर हिंदू खाटिक समाज संस्थेस दत्तनगरातील संयुक्त झोपडपट्टीत आमदार निधीतून बांधण्यात आलेले सभागृह भाडे कराराने देण्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली.