आॅनलाईन लोकमत सोलापूरराजकुमार सारोळे -
सोलापूर जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दिलेला १ कोटी ३५ लाखांचा निधी खर्ची न टाकता आल्यामुळे मार्च अखेर परत पाठविण्याची नामुष्की आली आहे. शासनाने जानेवारीमध्ये काढलेल्या नव्या अध्यादेशाचा फटका आरोग्य विभागाला बसला आहे. राज्य शासनाने गृहखाते वगळता सर्व खात्यांना ३१ मार्चपर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त खरेदी न करण्याचा आदेश १७ जानेवारी रोजी जारी केला आहे. याचा फटका आरोग्य खात्याला बसला आहे. आरोग्य विभागातर्फे विभागीय स्तरावर औषध पुरवठा केला जातो. असे असले तरी ऐनवेळी लागणारी तातडीची खरेदी करण्याचा त्या त्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून डिसेंबरमध्ये १ कोटी ३५ लाख रुपये आले होते, पण ऐनवेळी जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे हे पैसे खर्ची टाकता आले नाहीत. त्यात जानेवारी महिन्यात जारी करण्यात आलेल्या नव्या अध्यादेशामुळे आरोग्य विभागाला तातडीची औषधे खरेदी करण्यास अडचण निर्माण झाली.जिल्ह्यात जिल्हा आरोग्य विभागाची प्राथमिक आरोग्य केंद्रे व तालुकास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अंतर्गत असलेली तीन उपजिल्हा आणि १४ ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यात पंढरपूर येथे १०० तर अकलूज व करमाळा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ झाली आणि आता मार्चमध्ये तापमान कमी-जास्त होत आहे. अशात गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे व्हायरल फिव्हरचे (खोकला, सर्दी, अंगदुखी, थंडी, ताप) रुग्ण वाढले आहेत. अशात स्वाईन फ्लू संशयित रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे. असे असताना औषध खरेदीला अडचण निर्माण झाली. आता मार्च अखेर असल्याने निधी खर्ची न पडल्याने १ कोटी ३५ लाख जिल्हा नियोजनकडे परत पाठविण्यात आले आहेत. दरवेळेस मार्च एण्ड असल्याने शिल्लक असलेला निधी खर्ची टाकण्यास धावपळ उडते. पण यावेळेस मात्र गरज असूनही पैसे खर्च करता आले नाहीत, ही आरोग्य विभागाची शोकांतिका म्हणावी लागेल.---------------------आज मार्च एण्ड़़़़सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील ३१ मार्च हा शेवटचा दिवस असल्यामुळे कोषागार कार्यालये, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती यासह ट्रेझरीच्या जिल्ह्यातील बहुतांश शाखा तसेच विविध सरकारी कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरु राहतील़ ऐनवेळी रात्री बारा वाजता जिल्ह्यासाठी करोडो रुपये मिळतात त्याप्रमाणे आज किती निधी ऐनवेळी मिळतो याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे़ -----------------औषधाची गरज...जिल्ह्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव असल्याने औषधासाठी निधीची आवश्यकता आहे. तिजोरीत पैसे असूनही खर्च करता आले नाहीत. आरोग्य विभागाचा निधी परत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अध्यादेशात दुरुस्ती होईल म्हणून अधिकारी प्रतीक्षेत राहिले, पण शासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. ------------------पहिल्या टप्प्यातील ३४ लाख निधीतून वार्षिक औषध खरेदी झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात १ कोटी ३५ लाख आले, पण नव्या अध्यादेशात खर्चाची मर्यादा ५० हजार घालण्यात आल्याने निधी खर्च करता आलेला नाही. सध्या पुरेसा औषध साठा आहे. एप्रिलमध्ये नव्याने निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहोत. -डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक