शासनाने परवानगी दिलेल्या १० मानाच्या पालख्यांना पंढरपुरात प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरी पालखी तळावर बॅरिकेटींग, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, स्वछतागृहे, आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय व्यवस्था, वॉटरप्रुफ मंडप आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी यात्रा कालावधीत आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी फिरते आरोग्य तपासणी पथक, मुबलक औषधसाठा, रक्तसाठा, सुसज्ज रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नेमले जाणार आहे. मंदिर व मंदिर परिसर, नदी पात्र, घाट, प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता राखली जाणार आहे.
पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तत्काळ मिळाव्यात, आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी पंढरपुरात १४ आपत्ती व्यवस्थान कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाखरी तळ, विसावा मंदिर, चंद्रभागा नदी वाळवंट, तुकाराम भवन, मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृह, गोपाळपूर, सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय येथे मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा साजरी करताना, शासनाने निर्बंध घातले आहेत. शासनाने घेतलेला निर्णय नागरिक व भाविकांच्या हिताचा आहे. यामुळे सर्वांनी या निर्णयाचा मान राखून काेरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.