मंगळवेढा : विलास मासळ
टायटॅनिक सिनेमा मध्ये जे दाखवण्यात आले त्यापेक्षा अत्यंत विदारक आणि क्लेशदायक चित्र उघड्या डोळ्याने पाहावे लागले असून स्वतःचा जीव वाचवण्याच्या आकांताने साडे चौदा तास अरबी समुद्रामध्ये तग धरून राहिल्यानंतर भारतीय नौदलाने येऊन आमचा जीव वाचवला त्यामुळे भारतीय नौदल आमच्यासाठी देवदूत ठरले आहेत हा थरारक अनुभव मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी या गावातील विश्वजीत बंडगर या तरुणाला आला.
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील विश्वजीत बंडगर हा तरुण इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण करून सोलापूर येथे आयटीआय चा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या शोधात मुंबई येथे गेला वेल्डिंग क्षेत्रांमध्ये अतिशय चांगले काम करत असल्याने त्याला मुंबई येथील कंपनीमध्ये नोकरी मिळाली.
आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या 27 वर्षीय विश्वजीत बंडगर याला मुंबईसारख्या ठिकाणी नामांकित वेल्डर म्हणून कच्चे इंधन समुद्र तळातून बाहेर काढणाऱ्या जहाज कंपनीतील बार्ज मध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने तो आनंदी होता मात्र आपल्या आयुष्यात भयंकर मोठ्या संकटाला सामोरं जाण्याची परिस्थिती उद्भवणार आहे याची त्याला कसलीही कल्पना नव्हती पूर्वीपासून जहाजत काम करण्याबद्दल प्रचंड उत्सुक असणाऱ्या विश्वजितला या घटनेने जबर धक्का बसला असून हे चक्रीवादळ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोंगावत असल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणी मिळाली होती मात्र दरवर्षी अशा चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होते यातून कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही या आत्मविश्वासाने मुंबईपासून हजारो किलोमीटर आत असणाऱ्या या कामाच्या ठिकाणी काम करणार्या कोणालाही या तौत्के चक्रीवादळाची प्रचंड मोठ्या प्रमाणावरील होणाऱ्या आक्रमणाची कल्पना आलेली नव्हती.
दरम्यान या ठिकाणी तीनशेहून अधिक लोक काम करत होते ज्याक्षणी हे वादळ कामाच्या ठिकाणी येऊन धडकले त्यावेळी समुद्राशी जोडून ठेवणाऱ्या त्या जहाजाच्या साधनाचे मोठे नुकसान झाले आणि ते ठिकाण खराब झाले साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिल्याचे पाहून काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे धाबे दणाणले अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रामध्ये जीवन रक्षक जॅकेट घालून उड्या घेतल्या तर काहीजण त्या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने गायब झाले लहान असताना टायटॅनिक सिनेमा पाहण्यात आला होता त्यावेळी त्या सिनेमातील दृश्य पाहून थरकाप उडाला होता मात्र आपल्या आयुष्यात असा प्रसंग उद्भवणार आहे हे कधीही मनात आले नव्हते डोळ्यासमोर अनेकजण वाहून जात होते सोबत विविध विभागात काम करणारे सहकारी समुद्रातील वादळामुळे नाहीसे झाले तर चक्रीवादळामुळे समुद्रातून उत्पन्न होणार्या लाटा ह्या प्रचंड मोठ्या असल्याने याचा सामना करणे भयंकर कठीण झाले होते असे विश्वजीत सांगत होता.मात्र अशात विश्वजीत बंडगर यांनी आपली हिंमत सोडली नाही त्याच्या सोबत असणाऱ्या दोन मित्रांना त्याने आपल्याला काही होणार नाही हे संकट काही काळासाठी आहे आपण आपला आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही असे सांगत जीवनरक्षक जॅकेट अंगावर चढवत समुद्रामध्ये उड्या घेतल्या आणि इथूनच त्यांच्या जीवनमरणाचा संघर्ष सुरू झाला समुद्रातल्या भयंकर तुफान आणि वादळामध्ये 14 तासापेक्षा अधिक काळ समुद्रामध्ये तरंगत राहतात जीवन रक्षक जॅकेटचा एक भाग तुटून गेला डोक्याला जखम झाली सोबत असणाऱ्या एका मित्राचे जॅकेट निघून गेले त्याच्या हाताला हात देऊन त्यालाही हिंमत हरू न देता लढा सुरू ठेवण्यास सांगितले
अरबी समुद्रातील नॉर्थ भागांमध्ये सुरू असलेला हा मृत्यूचा तांडव आणि आपला जीव वाचवण्यासाठी सुरू असलेली मंगळवेढ्यातील या तरुणाची धडपड यापासून घरातली लोक अनभिज्ञ होती दरम्यान विश्वजीत याचा भाऊ विनोद याने चक्रीवादळाची कल्पना आल्यानंतर याबाबत विश्वजित यांच्याशी संपर्क साधला होता मात्र आलेल्या प्रसंगाला सामोरे गेलेल्या विश्वजीत कोणत्या परिस्थितीत आहे याबद्दल त्यांना काहीही माहिती मिळाली नाही घडलेली घटना भारतीय नौदल विभागा पर्यंत समजल्यानंतर त्यांच्याकडून मदत कार्य सुरू झाले.
समुद्रापासून हजारो अंतरावर असणाऱ्या ठिकाणी हेलिकॉप्टर आणि बचाव कार्य करणारे पथक जहाजांच्या माध्यमातून पोहोचले 70 फूट हूनही जास्त उंची असणारे नौदलाचे जहाज व नव दलातील सैन्याने जहाजातून रस्सी खाली टाकून आम्हाला जहाजात चढण्यासाठी प्रेरित केले सतत चौदा तासापेक्षा जास्त काळ पाण्यात असल्यामुळे अंगात कोणत्याही प्रकारचा त्राण शिल्लक राहिला नव्हता मात्र तरीही ही लढाई आपण जिंकणारच या ध्येयाने ती रसी पकडून अखेर आपला जीव वाचवण्यात यश आल्याचे विश्वजीत बंडगर यांनी सांगितले.