सोलापूर : महापालिका सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना स्थळावरील काडादी मंगल कार्यालयात १४० बेडचे कोविड केअर सेंटर उभारणार आहे. बाजार समिती १५० बेडचे कोविड सेंटर उभारणार असून पालिकेने डॉक्टर व इतर यंत्रणा द्यावी, अशी मागणी केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील काही सामाजिक संघटनांनी कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. सिद्धेश्वर कारखाना स्थळावरील मंगल कार्यालय महापालिका ताब्यात घेणार आहे. या ठिकाणी १४० बेड, डॉक्टर, नर्सची व्यवस्था करणार आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या ठिकाणी उपचार घेता येतील. महापौर श्रीकांचना यन्नम, मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह गटनेत्यांनी मंगळवारी मंगल कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर जुळे सोलापुरातील म्हाडा क्वारंटाइन सेंटर, होटगी रोड औद्योगिक वसाहतीमधील आरोग्य केंद्राच्या कामाची पाहणी करण्यात आली. येथे लवकरच लसीकरण सुरू होणार आहे.
कारखान्याचे मंगल कार्यालय पालिका ताब्यात घेणार आहे. याठिकाणी पालिकाच यंत्रणा उभारेल; परंतु आपतकालीन काळातील सामाजिक दायित्व म्हणून आम्हीही काही जबाबदारी उचलायला तयार आहोत. कोरोना लढ्यात आम्ही पालिकेच्या सोबत आहोत.
- धर्मराज काडादी, अध्यक्ष, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना.
पालिकेने झटकली जबाबदारी, सामाजिक संघटनांचा पुढाकार
महापालिकेने कोरोनाच्या लसीकरणाच्या ऑनलाइन नोंदणीची जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे लसीकरणाला उशीर होत आहे. ही जबाबदारी शहरातील सामाजिक संघटनांनी घेतली आहे. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम हे जुळे सोलापुरातील नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करणार आहेत. पालिका उपायुक्तांनी त्यांना परवानगी दिली आहे. हॅपी यूथ क्लबचे सोहम लोंढे, सामाजिक कार्यकर्ते राज सलगर हेसुद्धा आपल्या भागात नोंदणीचे काम करणार आहेत.