संताजी शिंदे सोलापूर : सोलापुरात सध्या घरफोडी, चोºयांचे प्रमाण वाढत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४० पोलीस मित्र गस्त घालत आहेत. पोलीस मित्रांना काठी, बॅटरी, शिट्टी व ओळखपत्र देण्यात आले असून दररोज २0 जण पोलिसांना मदत करीत आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे लोक परगावी जाण्याचे नियोजन करतात. घराला कुलूप लावून कुटुंबीय गावी गेल्याची संधी साधून चोरटे घरफोड्या करतात. हद्दीत होणाºया चोºयांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी १४० पोलीस मित्रांची बैठक घेतली. दररोज २0 पोलीस मित्र सोबत घेऊन चोºयासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्याची संकल्पना व्यक्त केली. पोलीस मित्रांनी त्याला होकार देत रात्री गस्त घालण्याची तयारी दर्शवली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरकूल पोलीस चौकी, गांधी नगर पोलीस चौकी, एमआयडीसी पोलीस चौकी, नई जिंदगी पोलीस चौकी आहे. प्रत्येक पोलीस चौकीचे दोन डीबी पथक व दोन बीट मार्शल यांच्यासमवेत ५ पोलीस मित्र देण्यात आले आहेत.पोलीस मित्र हे वर्षभरात केवळ नवरात्र उत्सव मिरवणूक, गणेश उत्सवातील प्रतिष्ठापना व विसर्जन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व अन्य सार्वजनिक उत्सवात पोलिसांच्या सोबत मदत म्हणून काम करतात. पोलीस मित्रांमध्ये कामगार, कॉलेज शिकणारे तरुण विद्यार्थी, व्यापारी अशी माणसे आहेत.
सर्व पोलीस मित्रांची पोलीस आयुक्तालयात आॅनलाईन नोंदणी करण्यात आली असून, त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. १४0 पैकी दररोज २० पोलीस मित्रांना आठवड्यातील एक दिवस देण्यात आला आहे. पोलीस मित्रांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक रस्ता, गल्ली, बोळ याची संपूर्ण माहिती आहे. पोलीस हवालदार शब्बीर तांबोळी हे सर्व पोलीस मित्रांचे नियोजन करतात.
लोकसहभागातून लोकांची सुरक्षा : बजरंग साळुंखे- पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी, लोकसहभागातूनच पोलीस मित्रांना सोबत घेण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून हा उपक्रम राबविण्यात आला असून, दरम्यानच्या काळात रात्रीची एकही चोरी झाली नाही. पोलीस मित्र मोठ्या उत्साहाने दररोज रात्र गस्तीसाठी येतात. पोलीस मित्रांची साथ मिळत असल्याने पोलीस कर्मचाºयांचा ताण कमी झाला आहे. सुरक्षित वातावरणाची निर्मिती झाली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.
नागरिकांमधून उपक्रमाचे स्वागत...- मागील काळातील चोºयांचे प्रमाण पाहता लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परगावी जाणाºया लोकांना घराच्या सुरक्षेची काळजी लागून राहात होती. पोलीस मित्रांच्या सोबतीने होत असलेल्या गस्तीमुळे अनेक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पोलीस मित्र आपले दररोजचे कामकाज सांभाळून, एक दिवस पोलिसांच्या मदतीला धावून जातात. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक या उपक्रमाचे स्वागत करीत आहेत.