सोलापूर : महापालिका क्षेत्रात मार्च ते जून या कालावधीत शहरात कोरोनाच्या १३ हजार ९०२ चाचण्या झाल्या. या तुलनेत जुलै महिन्याला आणखी तीन दिवस शिल्लक असताना १९ हजार ४४७ चाचण्या झाल्या आहेत. यात महापालिकेच्या अँटिजेन टेस्ट मोहिमेचा मोठा वाटा राहिला आहे. अवघ्या १३ दिवसांत शहरात ११ हजार ६८२ नागरिकांची चाचणी झाली आहे.
राज्यात मार्चपासून कोरोनाचा कहर सुरू झाला. सोलापुरातील संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन पुण्याला पाठविले जायचे. मार्चअखेर सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील लॅबमध्ये कोरोनाच्या चाचण्यांना सुरुवात झाली. काही दिवसांनी खासगी लॅबला टेस्ट करण्यास परवानगी मिळाली. १० एप्रिल रोजी सोलापूरच्या लॅबमध्ये एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. मात्र खातरजमा करण्यासाठी हा स्वॅब पुण्याला पाठविण्यात आला. १२ एप्रिल रोजी शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचे आणि तो मृत झाल्याचे जाहीर करण्यात आले. या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांचे अलगीकरण करणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेने त्यावरच काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून केले जात होते. स्वॅब टेस्टचा अहवाल येण्यास वेळ लागत असल्याने कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढली नाही. मार्च ते जून महिन्यात शहरातील १३ हजार ९०२ रुग्णांच्या चाचण्या झाल्या आहेत. या तुलनेत जुलै महिन्यात जादा चाचण्या करण्यात पालिकेला यश आले आहे.
१३ दिवसांत ५५२ जणांचे अलगीकरण
- - मनपाने १६ जुलैपासून शहरात अँटिजेन टेस्टला सुरुवात केली. १६ ते २८ जुलै या कालावधीत शहरातील ११ हजार ६८२ नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली.
- - यातून ५५२ लोक पॉझिटिव्ह तर ११ हजार १३५ लोक निगेटिव्ह आढळले. जुलै महिन्यात एकूण १९ हजार ४४७ चाचण्या झाल्या आहेत.
- - यातील ११ हजार ६८२ अँटिजेन टेस्ट असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.
चाचण्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह संदिग्धमार्च-एप्रिल-मे ८०७७ १०४० ६६६४ ३७३जून - ५८२५ १३०३ ४३०५ २१७जुलै - १९,४४७ २५०१ १६,८४२ १२४