टेंभुर्णी : टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आठ गावांतील सुमारे ४० हजार पात्र नागरिकांपैकी मागील सात महिन्यात फक्त १४,२३५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. रविवारी मात्र शहरात एका दिवसात एक हजार एवढे विक्रमी लसीकरण करण्यात आले.
टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील टेंभुर्णी, अकोले (खु.), फूट जळगाव, सुर्ली, दहिवली, कण्हेरगाव, शेवरे व माळेगाव या आठ गावांचा समावेश आहे. यामध्ये टेंभुर्णी शहर व टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीमधील लसीकरणास पात्र लोकांची संख्या सुमारे २० हजार एवढी आहे, तर उर्वरित सात गावांतील संख्याही तेवढीच आहे. या सुमारे ४० हजार नागरिकांपैकी आतापर्यंत फक्त १४ हजार २३५ लोकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या नऊ हजार ९२५, तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ३२१६ एवढी आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेले ५४४ व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ५५० एवढी आहे.
टेंभुर्णी शहरातील आठ हजार ३९४ लोकांचे लसीकरण झाले आहेत, तर उर्वरित सात गावात पाच हजार ८४१ लोकांना लस मिळाली आहे.
----
शनिवारी झाले विक्रमी लसीकरण
शनिवारी मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात विक्रमी लसीकरण झाले. टेंभुर्णी शहरातही १००३ एवढे विक्रमी लसीकरण झाले. याच दिवशी कण्हेरगाव येथेही ५१० व अकोले खु. येथे ५१७ एवढे लसीकरण करण्यात आल्याचे टेंभुर्णी पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. नंदकुमार घोळवे यांनी सांगितले.
यासाठी डॉ. अमोल माने, नितीन हिलाले, आरोग्य सहाय्यक मंदा गायकवाड, हनुमंत डांगे, अनिल गरड, मनीषा बैरागी, अर्चना कोळी, प्रतापसिंह वसावे, पल्लवी पवार, दीपाली शेटे, केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद, सुनील लोंढे, अजय कदम यांनी परिश्रम घेतले.