प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थांना राज्य शासनाचे १ लाख व केंद्र शासनाचे १.५० लाख असे एकूण २ लाख ५० हजार रुपये अनुदान वितरित करण्याची तरतूद आहे. सांगोला नगर परिषदेकडून बांधकाम सुरू असणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाचा १ लाखाचा हप्ता यापूर्वीच वितरित केला आहे. परंतु केंद्र शासनाच्या निधीअभावी योजनेतील घरकुलांची कामे रखडली होती. नगर परिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाचा निधी नगर परिषदेस प्राप्त झाल्याने पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केला आहे. एकूण १६१ लाभार्थ्यांना त्यांच्या बांधकामाच्या टप्यानुसार एकूण १ कोटी ४२ लाख ४० हजार रुपये अनुदानाचे वितरण केले आहे.
सांगोला नगर परिषदेस प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १,६०६ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त असून आजअखेर ४ सविस्तर प्रकल्प अहवालातून ४२३ मंजूर घरकुलांपैकी १६१ घरकुलांचे बांधकाम स्लॅब लेव्हलपर्यंत पूर्ण झाले असून आजअखेर ६४ घरकुल पूर्ण झाले आहेत. नगर परिषदेमार्फत या निधीचे वितरण करण्यात आल्याने रखडलेली घरकुलांची कामे सुरू होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या लाभार्थ्यांमधून समाधान होत आहे.
घरकुलाचे स्वप्न साकार होणार
केंद्र शासनाच्या निधीअभावी तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकुलांची कामे थांबली होती. नगर परिषदेस केंद्र शासनाचा निधी उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर तत्काळ अनुदान जमा केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचे नगराध्यक्षा राणी माने यांनी सांगितले.
कोट :::::::::::::::::::::::::::::::
घरकुलांची बांधकामे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांने त्वरित नगर परिषदेकडून वापर परवाना मिळवून योजनेचे नाव घरकुलांवर टाकून शेवटच्या हप्त्यासाठी अर्ज करावा. जेणेकरून नगर परिषदेस अंतिम हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सोईस्कर होईल.
- कैलास केंद्रे
मुख्याधिकारी, सांगोला