टेंभुर्णी : टेंभुर्णी शहर कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट केंद्र बनत आहे. एप्रिलच्या १५ दिवसात २६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. संचारबंदी मोडून अनेकांनी मुक्तपणे वावर सुरू केला आहे. पोलिसांचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच लस उपलब्ध नसल्याने दोन दिवसांपासून लसीकरणासही ब्रेक लागला आहे.
एप्रिल महिना कोरोना बाधितांची संख्या टेंभुर्णी शहरात आढळून आली आहे. गुरुवारी १३० लोकांची चाचणी केली असता ३८ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. एकीकडे शहरात कोरोना रुग्ण वाढत आहे तर नुकतेच चालू केलेले कोविड केअर सेंटर क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आल्याने हाऊसफुल झाले आहे.
टेंभुर्णी शहर व परिसरातील कोरोना रुग्णांसाठी नव्याने कोविड केअर सेंटर चालू करण्याची लोकांची मागणी आहे. याचबरोबर लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. परंतु लस उपलब्ध नसल्याने लसीकरणासही ब्रेक लागत आहे. एक दिवस लसीकरण नंतर दोन-तीन दिवस लसीकरण बंद अशी अवस्था निर्माण झाली आहे. लस कधी उपलब्ध होईल, हेही निश्चित नसल्याने नागरिक लसीकरणासाठी दररोज प्राथमिक आरोग्य केंद्रात हेलपाटे मारतात. लसीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. याच ठिकाणी टेस्टिंगसाठी व नियमित तपासणीसाठी येणा-यांची गर्दी होत आहे.
----
विलगीकरणाचा प्रश्न ऐरणीवर
शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून त्यांचे विलगीकरण कोठे करावयाचे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व कोविड सेंटर हाऊसफुल झाले आहेत. नवीन रुग्णांना घरातच विलगीकरण करण्याशिवाय प्रशासनासमोर दुसरा मार्ग राहिलेला नाही. लोकांच्या मुक्त वावरण्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विलगीकरणाचा प्रश्न ऐरणीवर
---
फोटो : १६ टेंभुर्णी ०२
लसीकरण व टेस्टिंगसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णी येथे लोकांनी केलेली गर्दी.