दूध : प्रशासनाने आधीच सांगितलेलं आहे, दुधाला दररोज सकाळी परवानगी आहे.
भाजीपाला : सर्वांच्या घरी, गरज नसताना प्रचंड प्रमाणामध्ये फ्रीजमध्ये भाजीपाला कोंबून ठेवला जात आहे. जास्त टिकणाऱ्या फळभाज्या जशा की दोडके, कोबी, कारले, बटाटा, कांदा, भेंडी, दुधी भोपळा, शेंगा, गवार, अशा गोष्टी पुढील ८-१० दिवस आरामशीर टिकतात. त्यामुळे विनाकारण भाजीपाला घ्यायचा आहे, या नावाखाली बाहेर जाऊन घरच्यांसाठी कोरोना संसर्ग घरी आणू नका.
एटीएम : थोडीबहुत घरी कॅश स्वतःजवळ ठेवा; परंतु लक्षात घ्या सर्व गोष्टी पंधरा दिवस बंद असणार आहेत. त्यामुळे सहसा कॅश लागणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं आता यापुढे ऑनलाइन ट्रान्झेक्शन करण्याची सवय १०० टक्के लावूनच घ्या.
लक्षात घ्या. यामध्ये सरकारचा फायदा नाही. तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी कॅशमध्ये ट्रान्झेक्शन न करता शक्यतोवर ऑनलाइन, गुगल पे, भीम, पेटीएम यासारख्या गोष्टी तुम्हाला शिकून घ्याव्याच घ्याव्या लागणार आहेत.
टिकटॉकवर व्हिडिओ बनवता येतात, अपलोड, डाऊनलोड करतात. यूट्यूब वरून पाहिजे ते व्हिडिओ, पिक्चर डाऊनलोड करून घेता येतात. अशा सगळ्या क्लिष्ट गोष्टी करता येतात. मग साध ऑनलाइन पेमेंट न शिकायला काय जातंय आपल्याला. येणाऱ्या काळामध्ये ऑनलाइन कॅश पेमेंटला पर्याय नाही.
औषधे :
ज्यांच्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना बीपी शुगर, थायराॅइड, दमा, अस्थमा पॅरालिसिस असे दुर्धर आजार आहेत. त्यांना महिन्या-महिन्याच्या गोळ्या लागत असतात. त्यांनी आधीच महिलाभराच्या गोळ्या घेऊन ठेवणे. भर लॉकडाऊनच्या काळामध्ये घराबाहेर डॉक्टरांची जुनी फाइल घेऊन बाहेर पडणे व पोलिसांशी वादावादी करून मला किती इमर्जन्सी आहे, असा खोटा प्रयत्न अजिबात करू नका.
आपल्याजवळच्या, नेहमीच्या डॉक्टरांचे कॉन्टॅक्ट नंबर सांभाळून ठेवणे. काही लागले तर किंवा स्वतः प्रत्यक्षात येऊन तुम्ही दाखवू शकता; पण लक्षात घ्या, सहसा अपॉइंटमेंट घेऊनच तिथे जाणे व पेशंट किंवा सोबत मॅक्झिमम एकच व्यक्ती जाणे. उगाचच चार-पाच लोक गाडी काढून दवाखान्यामध्ये अजिबात जाऊ नये.
हेल्पलाईन सेवा : प्रशासनाने सांगितलेले हेल्पलाइन नंबर, पोलीस, आरोग्य, सिव्हिल हॉस्पिटल, महानगरपालिका, दवाखाने, नजीकचे पोलीस ठाणे सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवा. त्यामुळे मनामध्ये काही शंका आली तर फोनवरून तिथे शंकानिरसन नक्कीच करू शकता.
लक्षात घ्या, तुम्ही-आम्ही सर्वांनी मिळून साथ दिली तरच हा १५ दिवसांचा लॉकडाऊन आपण पूर्ण करू शकतो.
- डॉ. सचिन कुलकर्णी, सोलापूर