साेलापूर : महापालिकेतील १५ आराेग्य सेविकांना (जेएनएम) आणि एएनएम यांना त्वरीत कामावर रुजू करुन घ्या, असे आदेश राज्याचे आराेग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिले हाेते. मात्र या सेविकांची सेवा समाप्त केल्याचा आदेश प्रशासनाने काढला.
महापालिकेने २०१९ पूर्वी कंत्राटी तत्त्वावर आराेग्य सेविकांची नियुक्ती केली हाेती. ही भरती मुलाखतीव्दारे झाल्याचा दावा १५ आराेग्य सेविकांकडून केला जाताे. या सेविकांना दर सहा महिन्याला मुदतवाढ दिली जात हाेती. काेराेनासह अनेक संकटाच्या काळात सेवा बजावली, मुलाखत घेउन भरती झाली यासह इतर मुद्यांच्या आधारे या सेविकांनी न्यायालयात धाव घेउन सेवा कायम करण्याची मागणी केली. सहा महिन्यांपूर्वी या सेविकांचे मानधन थकीत ठेवण्यात आले. या सेविकांना भेटण्यास प्रशासनाने नकार दिला हाेता. यावरुन महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह इतर नेत्यांनी प्रशासनाची कानउघडणी केली हाेती. १५ दिवसांपूर्वी फाेनवरुन या सेविकांना सेवा समाप्त झाल्याचा निराेप देण्यात आला. या सेविकांनी आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली. आराेग्यमंत्र्यांनी या सेविकांना कामावर रुजू करुन घ्या. न्यायालयाचा अवमान हाेईल, असे कृत्य करू नका असा निराेप दिल्याचे आराेग्य सेविकांच्या संघटनेकडून सांगण्यात आले हाेते. आराेग्य मंत्र्यांचा निराेप येउनी या सेविकांना कामावरुन काढून टाकल्याचा आदेश प्रशासनाने काढला.
आराेग्य विभागाकडून एएनएम, जेएनएम यांच्या मुदतवाढीबाबत काेणताही प्रस्ताव आलेला नव्हता. त्यामुळेच त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई झाली.- सामान्य प्रशासन विभाग, महापालिका.