बार्शी : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, मागील आठवड्यात तालुक्यात १५० कोरोनाबधितांची भर पडली आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. लसीकरणातही तालुका आघाडीवर आहे. आजपर्यंत तालुक्यातील ४७,६०१ जणांनी पहिला तर २१,११३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीची उपलब्धता नसल्याने अद्याप ही २६,४८८ जण दुस-या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
यातील अनेकांचा ८४ दिवसांचा कालावधीही पूर्ण झाला आहे. ५ जुलै ते १२ जुलै या दरम्यान १२,७१३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५० जण बाधीत आढळून आले. सध्याचा पॉझिटिव्ह रेट सरासरी १.१४, तर मृत्युदर हा ०.७८ टक्के आहे.
बार्शी तालुक्यात लसीकरणाची १७ केंद्रे आहेत. दररोज १० हजार जरी लस उपलब्ध असल्या तरी ती देण्याची तालुक्याची क्षमता आहे. मागील दहा दिवसांत केवळ ४३०६ जणांना लस मिळाली आहे. तालुक्यात आजपर्यंत ६८,७१४ जणांनी लस घेतली आहे, तर इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीमध्ये दहा दिवसांत साधारणपणे पाच हजार लोकांनी विकत लस घेतली आहे.
----
पहिल्या लाटेत १७८८१३ जणांची चाचणी
पहिल्या लाटेत १७८८१३ तर दुस-या लाटेत ६७७४६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात पहिल्या लाटेत ९७८८ तर दुस-या लाटेत १०२८९ असे एकूण २००६७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. पहिल्या लाटेत २४४ तर दुस-या लाटेत २१३ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेत पॉझिटिव्हिटी दर ५.४७ आणि मृत्यू दर २.४९ टक्के होता. दुस-या लाटेत पॉझिटिव्हिटी दर हा १५.१७ झाला होता. मात्र मृत्युदर हा पहिल्या लाटेपेक्षा कमी २.७ टक्के आहे.