सोलापूर: गारपीट नुकसान अनुदानाच्या यादीतून गळलेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ कोटी ९४ लाख इतक्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात वाटपासाठी आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.१६ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत झालेल्या गारपीटमध्ये जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे झाले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे ३०५ कोटी २७ लाख २९ हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम शासनाने तीन टप्प्यात दिली आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला ६३ कोटी ६० लाख, दुसऱ्या टप्प्यात १७१ कोटी तर तिसऱ्या टप्प्यात ७० कोटी ६६ लाख ५४ हजार रुपये देण्यात आले आहेत. पहिल्या दोन टप्प्यांची रक्कम तहसील कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली होती. काही रक्कम शेतकऱ्यांची बँक खाती नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पडून आहे. तिसऱ्या टप्प्याची ७० कोटी ६६ लाख ५४ हजारांची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने २१ मे रोजी तहसील कार्यालयांना वितरित केली आहे. ही रक्कम काही तहसील कार्यालयांनी बँकांकडे जमा केली आहे. परंतु काही तहसील कार्यालयांनी अद्याप ही रक्कम जमाच केली नाही. तहसील कार्यालयात तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. ते किती दिवस चालेल हे सांगता येत नाही, अशा पद्धतीने काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले. त्यापूर्वी शेतकऱ्यांना याद्याच पहावयाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे कोणाचे नाव आहे अन् कोणाचे नाही हे शेतकऱ्यांना समजलेच नाही. नुकसानीच्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी नंतर आंदोलन, उपोषण, निवेदने दिली. जिल्हाधिकाऱ्यांना मदतीतून वगळलेल्या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या निधीची रक्कम कळविण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार सात तहसीलदारांनी १५ कोटी ९४ लाख इतकी मागणी केली असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे निधीची मागणी केली आहे.---------------------------------------मोहोळने केली १० कोटींची मागणीपंचनामे झाले परंतु मदतीच्या पात्र यादीत नावे आली नसल्याच्या तक्रारी असलेल्यांसाठी १५ कोटी ९४ लाखांची मागणी केली आहे. त्यामध्ये मोहोळ १० कोटी, बार्शी एक कोटी ९६ लाख, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा प्रत्येकी एक कोटी, पंढरपूर एक कोटी ५ लाख, करमाळा ८५ लाख ९७ हजार, सांगोला ८ लाख रुपये. उत्तर तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांसाठी एक कोटीची मागणी केली असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगितले जात असले तरी त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात नाही.--------------------------------------जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानेनातगारपीट नुकसानीची दुसऱ्या टप्प्याची रक्कम लोकसभा मतदानाअगोदर १५ एप्रिलपूर्वी बँकांना पाठवली होती. त्यानंतर सव्वा महिन्याच्या फरकाने तिसऱ्या टप्प्याची रक्कम आली. ती रक्कम तहसीलदारांकडे देऊन २१ दिवस उलटले आहेत. ३१ मेपर्यंत ही रक्कम वाटप करण्याचे आदेश असताना उत्तर तालुक्यात आजही याद्याच करण्याचे काम सुरू आहे. याच आदेशाला जुमानले जात नसल्याने दुष्काळी निधी कधी जमा होणार, असा प्रश्न किमान उत्तर तालुक्याबाबत तरी सुरू आहे. -----------------------------------
गळलेल्या गारपीटग्रस्तांसाठी १६ कोटींची मागणी
By admin | Published: June 12, 2014 12:58 AM