मोहोळ : मागील आठवडाभरात मोहोळमधील १५ गावांत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, मोहोळ शहरासह तालुक्यातील १५ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर मोहोळ पोलिसांनी दंड आकारणी व गुन्हे दाखल करण्याची मोहीम तीव्र केली आहे.
मोहोळ शहरासह तालुक्यात मागील वर्षी काेरोनाच्या पाहिल्या लाटेत रुग्णसंख्या कमी होती. परंतु, दुसऱ्या लाटेत शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढ्त आहे. मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे.
१५ मे रोजी एकाच दिवसात शहरासह १७ गावात १,४२१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये मोहोळ शहर २०३ रुग्ण, पोखरापूर १८१, पेनूर १३९, आष्टी १५०, खंडाळी १०३, शेटफळ ७३, सौंदणे ६१, बेगमपूर ७२, कुरूल ६४, वाळूज ६३, खुनेश्वर ५७ ,शिरापूर ५३, टाकळी ६०, पापरी ६०, विरवडे १६ असे रुग्ण आढळले आहेत.
या लॉकडाऊन काळात विनाकारण दुचाकीवरून विनामास्क फिरणाऱ्यांवर मोहोळ पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी नगर परिषदेचे प्रशासक सचिन ढोले, तहसीलदार जीवन बनसोडे, मुख्याधिकारी एन. के. पाटील, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, आरोग्य अधिकारी अरुण पाथरुडकर यांचे प्रयत्न सुरु आहेत.
---
ही आहेत प्रतिबंधित गावे
या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १२ मे रोजी काढलेल्या आदेशात मोहोळ शहरासह तालुक्यातील पोखरापूर, पेनूर, आष्टी, खंडाळी, शेटफळ, सौंदणे, बेगमपूर, कुरूल, वाळुज, खुनेश्वर, शिरापूर, टाकळी, पापरी, विरवडे अशी १६ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.
---
फोटो : १६ मोहोळ
विनाकारण बाहेर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर मोहोळ पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.