चळे : आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग देवाच्या वालगानिमित्त (धार्मिक भोजन) दिलेल्या प्रसादातून १७० जणांना विषबाधा झाली. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ११८ रुग्णांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात, दोघांना पंढरपुरातील खासगी तर ५० जणांना आंबे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये लहान मुले, महिला, वृद्ध नागरिकांचा समावेश आहे.आंबे येथील राजाराम विठोबा पुजारी यांनी सोमवारी (५ मे) दर्लिंग देवाच्या वालगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थांना प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. वालगानिमित्त महाप्रसादामध्ये बुंदीचे लाडू, पुरी, भात, भाजी व मठ्ठा या पदार्थांचा समावेश होता. सोमवारी सायंकाळपर्यंत जेवण केलेल्या लोकांना मध्यरात्रीनंतर मळमळ, डोकेदुखी, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला; मात्र उन्हाच्या त्रासामुळे हा प्रकार घडला असल्याचे समजून लोकांनी गावातील डॉक्टरांकडे किरकोळ उपचार घेतले. गावातील डॉक्टरांकडे अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांनी भोजनातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवून डॉ. प्रसाद अंकुशराव, डॉ. श्रीकृष्ण शिंदे, डॉ. विशांत पाटील यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रुग्णांना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.नागरिकांचे सहकार्यआंबे ग्रामस्थांना विषबाधा होऊन त्रास होऊ लागल्यानंतर सरपंच भारत गायकवाड, आण्णा शिंदे, सचिन पाटील, अरुण शिंदे, तानाजी सावंत, नागनाथ सावंत, अर्जुन कोळी, संभाजी शिंदे या ग्रामस्थांनी खासगी वाहनातून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शासनाच्या व खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांमधून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.काय आहे वालगा?पंढरपूर तालुक्यातील चळे, आंबे व तारापूर येथे दर्लिंग देवाची मंदिरे असून चैत्र शु. पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा होतात. यात्रेनंतर आपापल्या कुवतीनुसार परिसरातील भाविक या देवांच्या पालख्या आपल्या घरी बोलावून त्यांचे मानकरी व पुजार्यांसह नातेवाईक, ग्रामस्थांना गोड जेवण देतात. या जेवणातूनच विषबाधा झाली असल्याचे सिद्ध झाले आहे.आंबे गावात भीतीवालगानिमित्त देण्यात येणार्या भोजनासाठी गावातील प्रत्येक घरातून माणूस निमंत्रित करण्यात येतो. सोमवारी राजाराम पुजारी यांच्या घरी झालेल्या वालगासाठी गावातील प्रत्येक घरातील माणूस जेवल्याने त्या सर्वांनाच त्रास होत असून, या घटनेमुळे गावात भीती पसरली आहे. ग्रामस्थ व नातेवाईकांना घटना समजल्यानंतर पंढरपूरकडे धाव घेतली.
आंबे गावात प्रसादातून विषबाधा १७० जण रुग्णालयात दाखल: दोघे गंभीर
By admin | Published: May 07, 2014 8:35 PM