सोलापूर : युवकांना स्वयंरोजगाराची दालने खुली करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने राबविलेल्या योजनांमध्ये २०१८ पासून दोन हजार ९२१ युवकांना लाभ मिळाला आहे, तर संबंधित बँकांनी १७२ कोटी ७१ लाख ४४ हजारांहून अधिकचे कर्ज मंजूर केले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून अद्याप या व्याजाचा परतावा म्हणून १२ कोटी कोटी ९ लाख ८८ हजार रुपये देण्यात आले आहेत.
महामंडळाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर कार्यालयामार्फत केले जाते. बेरोजगार युवक, युवतींना आर्थिक मदतीचा हात देत, स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. कर्ज योजनेचा लाभ कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, तसेच लघू मध्यम उद्योगासाठी घेण्यात यावा, उत्पादन, व्यापार, विक्री, सेवा या क्षेत्रासाठीही या योजनेतून कर्ज उपलब्ध केले जाते.
कर्जासाठी येथे करा अर्ज
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना बेरोजगार उमेदवारांसाठी उपलब्ध असून, गरजू उमेदवारांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महामंडळाकडून व्याजाचा परतावा या योजनेंतर्गत अर्थसाहाय्य दिले जाते. बेरोजगार उमेदवारांनी www.udyog.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर LOI (Letter of Intent) जनरेट होतो. बॅंकेने संबंधित उमेदवाराच्या कर्ज प्रस्तावाला मान्यता दिल्यास महामंडळातर्फे व्याजाची रक्कम उमेदवारांच्या बचत खात्यात परत करण्यात येते.
कर्जासाठी कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांच्या आत असावे
'अण्णासाहेब पाटील महामंडळा'अंतर्गत नवउद्योजकांना विनातारण कर्ज देण्याचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून दिले जात आहे. या योजनेसाठी गटातील सर्व सदस्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या मर्यादेत असणे अपेक्षित आहे.
काय कागदपत्रे लागतात
आधार कार्ड, रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला, लाईट बिल, रेशनकार्ड, गॅस बिल किंवा बँक पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा), उत्पन्नाचा पुरावा (तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, आयटी रिटर्न, जर लग्न झाले असल्यास पती-पत्नीचे व लग्न झाले नसल्यास स्वत:चे आयटी रिटर्न अनिवार्य), जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अशी कागदपत्रे आवश्यक राहतील.
ज्या उमेदवाराचे प्रकरण बँकेत प्रलंबित आहे अशांनी व ज्यांना अजूनदेखील महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांनी महामंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयास भेटावे. बँकेत प्रकरण सादर करतेवेळी आपल्या प्रकरणासोबत विनंती अर्ज जोडावा व बँकेने प्रकरण नाकारले असल्यास तसे लेखी कारण बँकेकडून घ्यावे.
- योगेश वाघ, सोलापूर जिल्हा समन्वयक
---