सोलापूर : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, उतर सोलापूर, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी १७२.६१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या विभागाकडून या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळायचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील विविध रस्त्यांचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील ३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांमध्ये नाविंदगी ते कल्लहिपरगे, नाविंदगी ते नागणसुर, नागणसुर ते हैद्रा, केगाव ते पानमंगरूळ, पानमंगरूळ ते कल्लहिपरगे या कामांना मंजुरी मिळाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी ते यड्रव ते हुलजंती, शेळेवाडी ते गणेशवाडी-खुपसुंगी-जुनोनी - नंदेश्वर या १३ किलोमीटर रस्त्यांच्या कामास १० कोटींहून अधिक निधी मंजूर झाला आहे. मोहोळ तालुक्यातील नरखेड ते अनगर, खवनी ते सारोळे - चिखली, अर्जुनसोंड ते सावळेश्वर, कुरुल ते पिंपरी, दादपूर ते पिरटाकळी अशा २९ किलोमीटरसाठी २५ कोटींचा निधी मंजूर आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची ते कोंडी-अकोलेकाटी, राष्ट्रीय महामार्ग ते कोंडी-कारंबा -मार्डी ते जिल्हा हद्द, बाणेगाव ते कारंबा -चिंचोळी एमआयडीसी अशा २२ किलोमीटरसाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
---------------
पंढरपूर तालुक्यातील या कामांना मिळाला हिरवा कंदील
पंढरपूर तालुक्यातील वडाचीवाडी- वाखरी-कोर्टी, करकंब भोसे मधला मार्ग ते होळे, करकंब ते घोटी मार्गे तालुका हद्द, ओझेवाडी-सरकोली ते शंकरगाव या सुमारे ३० किलोमीटर रस्त्यांसाठी २१ कोटी रुपये मंजूर झाले असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव ते कुंभारी, दहिटणे ते सिंदखेड, गंगेवाडीपासून कासेगाव, उळे, उळेवाडी, बक्षीहिप्परगा मार्गे मुळेगाव तांडा, कासेगाव ते वडजी, एनएच ६५ ते मुळेगाव मार्गे कुंभारी या रस्त्यांचा समावेश आहे.
----------------
ग्रामविकास विभागाने या कामांना दिलेल्या प्रशासकीय मंजुरीचे पत्र पाठवीत सोलापूरकरांना आनंदाची बातमी दिली. या कामी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे सोलापूरवासियांच्या वतीने आभार मानले. जिल्ह्यातील अत्यंत आवश्यक व त्रासदायक रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल.
- खा. जयसिध्देश्वर महास्वामी,
खासदार, सोलापूर