सोलापूर :
कॉपी बहाद्दर विद्यार्थी कॉपी करण्यासाठी विविध पर्याय शोधतात. अशांना शोधून काढण्यासाठी सोलापूर विद्यापीठाच्या भरारी पथकाचाही कस लागतो. शुक्रवारी भरारी पथकाने तब्बल १८० विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. काही विद्यार्थ्यांच्या बुटात तर काही युवतींच्या केसांमध्ये मजकूर लिहिलेला कागद सापडला. कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांची चलाखी पाहून भरारी पथकातील अधिकारीदेखील आवाक् झाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सध्या पदवीच्या परीक्षा सुरू आहेत. पदवीच्या द्वितीय वर्षातील सोळा हजार विद्यार्थ्यांनी शुक्रवारी परीक्षा दिली. परीक्षा दरम्यान १८० विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी कॉपी केली असून आतापर्यंत ३५० विद्यार्थ्यांनी कॉपी आहे. सर्व कॉपी बहाद्दरांना परीक्षा संपल्यानंतर आठ दिवसांत विद्यापीठाच्या लॅप्सेस समितीसमोर हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
विद्यापीठाकडून सध्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. शुक्रवारी बीए, बीएससी, बीकॉम, बीबीए, बीसीए यासह इतर पदवीच्या द्वितीय वर्षातील सोळा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विद्यापीठाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. परीक्षा सुरू असताना अचानकपणे परीक्षा हॉलला भेट देऊन भरारी पथके कॉपी बहाद्दरांना रंगेहाथ पकडत आहेत. शुक्रवारी एका दिवसात तब्बल १८० विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले.